आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक कीर्तीच्या लोणारमधील वास्तूंचा -हास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणार - जागतिक कीर्तीचे खा-या पाण्याचे सरोवर असलेल्या लोणार शहरातील पुरातन वास्तू व मंदिरांचा देखभाल, दुरुस्तीअभावी -हास होत आहे. लोणार येथे येणा-या पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने ही मंदिरे व वास्तू महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, पुरातत्त्व विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

शहरातील पुरातन वास्तू व मंदिरानजीक कच-याचे ढीग साचले असून, त्यांच्या परिसरात अतिक्रमण वाढत आहे. पुरातत्त्व विभागाकडून या वास्तंूच्या परिसरात अतिक्रमण करणा-या, असभ्य वर्तन करणा-यांसह अवैध धंदे चालवणा-यांवर अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. प्रत्यक्षात मात्र या वास्तूंच्यासमोर गैरकृत्य करणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, सोबतच अशा प्रकरणात दोषी आढळणा-यांना सात ते दहा वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असल्याचे फलक लावण्यात आलेले आहेत. मात्र, हे फलकही येथे केवळ बुजगावण्याची भूमिका निभावत आहेत.

पुरातत्त्व विभागाकडे प्राचीन मंदिरांची व वास्तूंची देखरेख, साफसफाई करण्यासाठी एकही कर्मचारी नाही. त्यामुळे दैत्यसुदन मंदिर परिसरात सर्रास अवैध धंदे चालतात. या मंदिरासह रामगया, धारातीर्थ, कुमारेश्वर मंदिर लव्ह पॉइंट बनले आहेत. गांज्या, दारू, पत्ते खेळणा-यांचा येथे मुक्त संचार असल्याची चर्चा आहे. पुरातत्त्व विभागाच्या ताब्यातील वास्तूंचे जतन करण्यासाठी अधिकार असताना वरिष्ठ अधिका-यांनी पुरातन ठेवा एकप्रकारे वा-यावर सोडल्याचे चित्र आहे. लोणार सरोवर जागतिक वारसा म्हणूून जतन व संवर्धन करण्याचे जागतिक पातळीवर प्रयत्न होत आहेत. सरोवर परिसरातील पुरातन वास्तूमुळेच हे शक्य होणार आहे. पुरातत्त्व विभाग मात्र दखल घेण्यास तयार नाही.

नागपूरकडे हस्तांतरित
लोणार विभाग प्रारंभी औरंगाबाद पुरातत्त्व विभागाकडे होता. त्या वेळी येथे अनुदान तत्त्वावर पाच कर्मचारी कार्यरत होते. त्यांनी धारातीर्थासह पुरातन वास्तूंची देखभाल व स्वच्छता ठेवली होती. मात्र, जवळपास सहा महिन्यांपूर्वी लोणार विभाग नागपूर पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित केला आहे. तेव्हापासून येथील वास्तूंकडे या विभागाचे दुर्लक्ष होत आहे. हस्तांतरणानंतर येथील अनुदानावरील कर्मचारी कमी केले आहेत. धारातीर्थावरील पाय-यांचे निर्माण कार्यही बंद केले आहे.

तक्रार करणार
- याप्रश्नी आपण पंतप्रधानांकडे तक्रार करणार असून, लोकसभेतही हा प्रश्न लावून धरणार आहोत. नागपूर पुरातत्त्व विभाग प्रमुखांच्या अकार्यक्षमतेने लोणारमधील पुरातन वास्तूंचा ºहास होत आहे. पुरातन वास्तू जतनास प्राधान्य आहे.’’ प्रतापराव जाधव, खासदार.

तरतूद न केल्यास आंदोलन
- नागपूर विभाग प्रमुखांकडून पुरातन वास्तूंची थट्टा होत आहे. औरंगाबाद विभागाअंतर्गत येथे 150 व्यक्तींना कायम करून वास्तूंचे जतन,संवर्धन होत होते. मात्र, नागपूरकडे हा विभाग हस्तांतरित झाल्यानंतर कर्मचा-यांना कामावरून कमी केले. याप्रश्नी तरतूद न झाल्यास शिवसेना आंदोलन करेल.’’ प्रा. बळीराम मापारी, तालुका प्रमुख, शिवसेना.

पुरातत्त्व विभाग प्रमुखांचे बेजबाबदार वक्तव्य
- लोणार येथे पुरातत्त्व विभागाचे अधिकारी अलोने भेटीसाठी आले असता त्यांना पुरातन वास्तूंचा ºहास होत असल्याबाबत कल्पना दिली होती. येथे कर्मचा-यांची गरज आहे, असे सांगितले होते. मात्र, त्यांनी पुरातत्त्व विभागाचे हे काम नसल्याचे व स्थानिक लोकांनी ही कामे करावी, असे बेजबाबदार वक्तव्य केले.’’ - सु. त्र्य. बुगदाणे, अभ्यासक, लोणार.

लोणार पुरातत्त्व विभागांतर्गत लोणार येथे दोन, तर सिंदखेडराजा, साकेगाव आणि रोहिणखेड येथे प्रत्येकी एक असे पाच कर्मचारी कार्यरत आहेत. लोणार पुरातत्त्व कार्यालयांतर्गत लोणार येथील मंदिरांसह सिंदखेडराजा येथील तीन मंदिर, देऊळगावराजा येथील दोन, साकेगाव दोन मंदिर, रोहिणखेड एक, मेहकर येथील एक व सातगाव भुसारी येथील एका मंदिराचा समावेश आहे. या कार्यालयात एस. ए. महाजन व एस. गीते हे फोरमन म्हणून काम पाहतात. मंदिर व पुरातन वास्तूंची देखरेख, साफसफाईचे काम त्यांच्याकडे आहे. मात्र, त्यांच्याकडील भार पाहता लोणार येथील वास्तूंच्या देखभालीसाठी सध्या एकही कर्मचारी उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती आहे.