आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिलिंडरसाठी हाहाकार;ग्राहकांना मारावे लागतात हेलपाटे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - घरगुती गॅस सिलिंडरचा शहरात प्रचंड तुटवडा झाल्यामुळे ग्राहकांमध्ये भयंकर नाराजी आहे. पुरवठा विभाग सणासुदीच्या काळात आपली जबाबदारी पुर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. सिलिंडर मिळविण्यासाठी लोकांना तासन तास वाट पाहावी लागत आहे. या परिस्थितीतही जिल्हा यंत्रणेचे मौन चकित करणारे आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात सिलिंडरसाठी हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. पोलिस संरक्षणात गॅसपुरवठा एजन्सींना सिलिंडरची विक्री करावी लागत होती. या प्रकाराला संबंधित एजन्सीधारक दोषी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शहरात व जिल्ह्यात अवैधरीत्या सिलिंडरची विक्री होत आहे. ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर काही एजन्सीत नागरिकांना सिलिंडरसाठी ताटकळत उभे राहावे लागते. गेल्या काही दिवसांपासून सिलिंडरचा शहरात तुटवडा जाणवत आहे.

अनुदानित सिलिंडरची किंमत 447 रुपये आहे. विनाअनुदानित सिलिंडरची किंमत 920 रुपये आहे. सणासुदीचे दिवस असल्याने महिला वर्गाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शहरात बारा एजन्सी
अकोला शहरात ग्राहकांच्या सेवेसाठी बारा गॅस एजन्सी आहेत. यामध्ये इंडियन कॉर्पोरेशन कंपनीच्या तीन गॅस एजन्सी आहेत. त्यांचा प्रकल्प धनज येथे आहे. यासोबतच भारत पेट्रोलियम कंपनीच्या तीन एजन्सी आहेत. त्यांचा प्रकल्प जळगाव येथे आहे, तर हिंदुस्थान कॉर्पोरेशन कंपनीच्या चार गॅस एजन्सी आहेत. त्यांचा प्रकल्प निंभोरा येथे आहे.

नंबरचा काय उपयोग
महिनाभर आधी नंबर लावूनही वेळेवर सिलिंडर मिळत नाही. मग नंबर लावण्याचा उपयोग काय? दिवाळीच्या काळात फराळाचे पदार्थ करण्यासाठी गॅसचा जास्त वापर होत असतो. यादृष्टीने कमीत कमी सणाच्या काळात तरी गॅस सिलिंडरची अडचण निर्माण होणार नाही, अशी व्यवस्था करायला हवी. निर्मला सोनुने, गृहिणी

तारेवरची कसरत
नोकरी आणि घर सांभाळून दिवाळीची तयार करावी लागते. त्यातही गॅस सिलिंडर मिळत नसल्याने कामांचे नियोजन करताना नाकीनऊ येतात. सणाच्या काळात सिलिंडर मिळाले नाही, तर तारेवरची कसरत करावी लागते. मंजू पिल्ले, शिक्षिका.

तांत्रिक अडचण
ज्या राज्यातून सिलिंडरचा माल येतो तिथे मशीन खराब झाल्यामुळे सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे तसेच पावसाळा व हिवाळ्यामध्ये सिलिंडरचा अधिक वापर होत असल्याने काही प्रमाणात सिलिंडरचा तुटवडा भासत आहे. विजय चोपडे, संचालक, विजय गॅस एजन्सी, अकोला.

काळजी घेण्यात येत आहे
जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा भासू नये, यासाठी संबंधिताना सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहे. ग्राहकांना सिलिंडर मिळावे यासाठी पूर्ण काळजी घेतली जात आहे. नरेश वंजारी, जिल्हा पुरवठा अधिकारी

सिलिंडरसाठी दाणादाण
या वर्षी दिवाळी सण रविवारी आल्याने सणासुदीलाही सिलिंडर मिळते की नाही, या विवंचनेत महिलावर्ग दिसत आहे. गॅस एजन्सीच्या ढिसाळ कारभामुळे सिलिंडरधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एजन्सीच्या ढिसाळ कारभारामुळे हाल होत आहे.