आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मानसिकता बदलल्याशिवाय जनजागृती करणे शक्य नाही, माधुरी मडावींचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ग्रामीण भागासह शहरी भागातील महिलांनादेखील मासिक पाळी आणि त्याच्याशी संबंधित स्वच्छता, आरोग्य याविषयी माहिती नाही. यासाठी जनजागृतीची मोठी गरज आहे. मात्र, आपली ऐकून घेण्याची, बोलण्याची तयारी नसेल, तर त्या जनजागृतीचा उपयोग होऊ शकत नाही. जनजागृतीसाठी आधी आपली मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महापालिका उपायुक्त माधुरी मडावी यांनी केले. शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात २७ मे रोजी आशा कार्यकर्त्यांच्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या.
शिवाजी महाविद्यालय आणि नीड्स बहुउद्देशीय आणि संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक माहवारी स्वच्छता दिनानिमित्त ‘रेड डेज टू ग्रीन डेज’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या उद््घाटन समारंभात माधुरी मडावी यांनी सॅनिटरी नॅपकिनच्या विल्हेवाटाची मोठी समस्या आणि आपली मन:स्थिती यावर विचार मांडले. एकीकडे आपण वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत आणि दुसरीकडे मुलगी तिच्या वडिलांसोबतदेखील मासिक पाळी या विषयावर बोलत नाही. एवढेच काय तर पुरुष हा शब्द उच्चारायलादेखील कचरतात. मासिक पाळी या विषयावर खुले चर्चासत्र होण्यासाठी आधी घरात खुला संवाद होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी पुरुषांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
अमरावती विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागाच्या अधिष्ठाता डॉ. रेखा लांडे, गृहविज्ञान विभागाच्या प्राध्यापिका डॉ. अंजली कावरे यांनी विचार मांडले. पत्नीच्या पाठिंब्याशिवाय पुरुषांची प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक महिलेने आपल्या जोडीदाराला कशा प्रकारे सहकार्य करावे, हे माता रमाईकडून शिकण्यासारखे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी केले. नीड्स संस्थेचे संचालक कृष्णा रामावत यांनी प्रास्ताविकात कार्यशाळा आयोजनामागील भूमिका, उद्दिष्ट स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांची गजघाटे या विद्यार्थिनीने केले, तर विशाल राखोंडे यांनी आभार मानले. या वेळी डॉ. एम. आर. इंगळे, अॅड. आनंद बुढईकर, डॉ. महेश पुरी, अमोल मानकर, सुनीता गजघाटे, प्रा. समाधान वानखडे, डॉ. आशिष राऊत, जीवन पवार, आनंद चौबे, प्रा. राहुल माहुरे, विशाल नंदागवळी, रॉजर अघमकर, राम घमंडी, कीर्ती रामावत, करुणा भोपळे उपस्थित होते.
पहिल्या दिवशीचे सत्र
जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेत आज पहिल्या दिवशी जवळपास तीन सत्रांमध्ये आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. नीड्स बहुउद्देशीय संशोधन संस्थेचे संचालक कृष्णा रामावत यांनी महिलांना प्राथमिक माहितीपासून विविध बाबींचे प्रशिक्षण दिले. ब्रेक सायलेन्स या पहिल्या सत्रात महिलांना बोलते केले. यात त्यांनी प्राथमिक माहितीसह महिलांचे ज्ञान तपासले. दुसऱ्या सत्रात शरीराची रचना यासह वैज्ञानिक दृष्टिकोन समजून सांगण्यात आला. महिलांनी चित्रांच्या माध्यमातून महिला आणि पुरुष यांच्या शरीरातील तफावत, साम्य समजून घेतले. तिसऱ्या सत्रात गैरसमज याविषयी चर्चा करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...