अकोला- महाराष्ट्राचे देशाच्या आर्थिक विकासात अग्रस्थान होते. पूर्वीसारखे अर्थव्यवस्थेचे इंजिन बनायचे असेल तर राज्यात सत्ता परिवर्तन आवश्यक आहे. आघाडीच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रात अधोगती झाली असल्याचे सांगून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री
शिवराजसिंह चौहान यांनी तेथील विकासाचे गोडवे गायले.
रविवारी दुपारी खुलेनाट्यगृहात भाजपचे अकोला पश्चिमचे उमेदवार गोवर्धन शर्मा आणि पूर्वचे रणधीर सावरकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार संजय धोत्रे होते. तीन तास उशीर होऊनही सभेला चांगली उपस्थिती होती. चौहान म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकाळात टूजी, थ्रीजी, आदर्श, सिंचन, जिजाजी घोटाळा झाला. जनता त्यामुळे त्रस्त झाली आहे. युतीच्या काळात महाराष्ट्रात भारनियमन नव्हते परंतु आता लोकांना, शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. मध्यप्रदेशात चोवीस तास वीज मिळते, शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देतो आहोत, सिंचन क्षेत्र सात लाख हेक्टरवरुन साडेसत्तावीस लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. सैतानसिंग पाल भोपाळ यांचे सुरुवातीला भाषण झाले. तसेच, आ. गोपीचंद नेमा इंदुर, बऱ्हानपुरच्या महापौर माधुरी पटेल, अॅड. मोतीसिंग मोहता यांचीही भाषणे झालीत. व्यासपीठावर महापौर उज्ज्वलाताई देशमख, अश्विनीताई हातवळणे, सुमनताई गावंडे, उमेदवार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, डॉ. अशोक ओळंबे, विजय अग्रवाल, किशोर पाटील, दीपक मायी आदी व्यासपीठावर होते. सुत्रसंचालन सिद्धार्थ शर्मा यांनी केले.
भाजपमध्ये प्रवेश :
काँग्रेसनेते जहुरुद्दिन चव्हाण, शेरुभाई अंदेरे, मनसे महिला आघाडीच्या अॅड. कल्पना घोरपडे, वंदना राव, मीना राव यांच्यासह आठ पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.
मामा हू मै....
शिवराजसिंह चौहान यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. राजराजेश्वर नगरीत आमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त करतो असे म्हटल्यावर मामा हू मै, असे वाक्य त्यांनी उच्चारले आणि सभेत हशा पिकला. गोंदिया सासुरवाडी असल्याने त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला भावनिक नाते जोडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राप्रती
आपलीही जबाबदारी असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.