Home »Maharashtra »Vidarva »Akola» Maha E Seva Issue At Akola Server Down

डोकेदुखी: ‘महा ई-सेवा’चे सर्व्हर डाऊन; नागरिक त्रस्त

प्रतिनिधी | Dec 09, 2013, 14:08 PM IST

  • डोकेदुखी: ‘महा ई-सेवा’चे सर्व्हर डाऊन; नागरिक त्रस्त
अकोला- शहरातील महा ई-सेवा केंद्राचे सर्व्हर शुक्रवारपासून डाऊन असल्यामुळे नागरिकांना चांगलीच डोकेदुखी होत आहे. याचा फायदा घेत काही महा ई-सेवा केंद्र संचालक नागरिकांची आर्थिक लुबाडणूक करत आहेत. महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नागरिकांच्या सेवेकरिता शासनाने महा ई-सेवा केंद्र सुरू केले आहेत. मात्र, फायद्याऐवजी नागरिकांना हेलपाटे घालावे लागत आहेत. विद्यार्थ्यांना व नागरिकांना शासनाच्या विविध दाखल्यांची गरज भासते. शुल्क देऊनही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्व्हर डाऊन असल्याची सूचना देणारे कोणतेही फलक न लावण्यात आल्याने नागरिकांना मनस्ताप होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरातील कित्येक नागरिकांनी विविध दाखल्यांसाठी महा ई-सेवा केंद्राकडे अर्ज दाखल केले. त्यांना सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगून त्यांना आल्यापावलीच परत पाठवले जात आहे. याचाच फायदा घेत अतिरिक्त शुल्क घेत महा ई-सेवा संचालक नागरिकांची आर्थिक लुबाडणूक करत आहेत. यासंदर्भात महसूल प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रार केल्यावरही यावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे महा ई-सेवा संचालक नागरिकांची आर्थिक लूट करण्यासोबतच त्यांना अपमानजनक वागणूक देत असल्याचे शहरातील काही केंद्रांवर दिसून येत आहे.
नाहक होत आहे मनस्ताप
शेतीसंदर्भात लागणार्‍या दस्तऐवजासाठी नेहमी महा ई- सेवा केंद्रात यावे लागते. बरेच वेळेस सर्व्हर डाऊन राहत असल्याने आम्हा शेतकर्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गावापासून येण्या-जाण्याचे बसभाडे तर खर्च होतेच परंतु दिवसही वाया जातो. सर्व्हर डाऊन ही समस्या नित्याचीच झाली असल्याने यासाठी उपाययोजना आवश्यक आहेत. संबंधितांनी याकडेलक्ष पुरवणे गरजेचे आहे.
-सुभाष अहीर, शेतकरी
ऑफ लाइनमुळे शासनाला चुना
गेल्या दोन दिवसांपासून महा ई-सेवा केंद्राचे सर्व्हर डाऊन आहे. त्यामुळे शहरात केंद्राचे सध्या ऑफ लाइन कामकाज सुरू आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. सेतू केंद्र सुरू असताना असा प्रकार कधी घडला नाही. त्यामुळे परत सेतू केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.
माहिती देण्यात आली
संबंधिताना याची माहिती देण्यात आली. नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. यासंदर्भात दक्षता घेण्यात येत आहे.
-अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी
सर्व्हर डाऊनमुळे होतेय गैरसोय
महा ई-सेवा केंद्राचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे गेल्या दोन दिवासांपासून प्रमाणपत्र न मिळाल्याने नागरिक त्रस्त आहेत. प्रशासनाने यात लक्ष घालून यंत्रणा सुरळीत करावी.
-मंगलसिंग ठाकूर, त्रस्त नागरिक

Next Article

Recommended