आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहेब, काहीही करा पण आम्हाला घर द्या हो ..!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - साहेब,काहीही करा पण आम्हाला घर द्या हो, अशी आर्त हाक रामनगरातील गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या उपविभाग कार्यालयात सोमवारी कानावर पडली. २० ते २५ लाभार्थी म्हाडाच्या अभियंत्याला याचना करताना दिसून आले. समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने फ्लॅटधारकांनी कार्यालयात ठिय्या दिला.

रामनगरात म्हाडा कॉलनी साकारल्या जात आहे. अकोल्यातील ६० नागरिकांना सन २०१० मध्ये गाळे मंजूर करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत त्याचा ताबा देण्यात म्हाडा व्यवस्थापनाकडून दिरंगाई केली जात आहे. नागरिकांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, महापालिकेकडून अडचण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या बांधकामासाठी तीन ते चार टप्प्यांत प्रत्येक फ्लॅटधारकाने आतापर्यंत सात लाखांपेक्षा अधिकची रक्कम म्हाडाकडे जमा केली आहे. दीड वर्षांपासून काम बंद असल्याने निर्धारित वेळेत फ्लॅट उपलब्ध करून देण्यास म्हाडाची तयारी नाही. त्याचा फटका येथील फ्लॅटधारकांनाच बसण्याची चिन्हे आहेत. त्वरित फ्लॅट द्यावे तसेच अतिरिक्त शुल्काची वसुली लाभार्थ्यांकडून करू नये, अशी मागणी करत आज पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या कार्यालयात, जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त, म्हाडा अधिकारी यांना या योजनेतील लाभार्थ्यांनी निवेदन दिले.

म्हाडा मनपा अधिकाऱ्यांना निवेदन देत यातून तोडगा काढण्याची मागणी केली. यासंबंधीचे निवेदन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे कार्यालय, स्थानिक लोकप्रतिनिधी, मनपा आयुक्त जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदन देणाऱ्यांमध्ये विलास मोरे, गीतांजली कांबळे, सुनीता जोशी, ओंकार इंगळे, सचिन देशपांडे, विजय देशमुख, श्रीधर कसुरकार, मीरा शाहू, वनमाला चौके, प्रशांत भुले यांंच्यासह इतरांचा समावेश होता.

अर्धसत्य
म्हाडा कॉलनीतील बांधकामाच्या मंजूर अभिन्यासातील विकासाची कामे प्राथमिकतेने पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र, ती केल्याने बांधकामाची परवानगी थांबवण्यात आली आहे. संदीप गावंडे, सहायक नगर रचनाकार, महापालिका अकोला.

मनपाकडून मंजुरी हवी
८४ गाळ्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे. आणखी ६० बांधायचे राहिले आहेत. महापालिकेकडून मंजुरात मिळाल्यास तत्काळ कामास सुरुवात करण्यात येईल. '' विनोद उईके, उपमुख्य अभियंता, म्हाडा

सहानुभूतीने विचार व्हावा

गृहनिर्माण संस्थेने महापालिकेला सादर केलेल्या सुधारित नकाशास मंजुरी द्यावी. जेणेकरून या नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.'' श्रीधर कसुरकर, लाभार्थी

घरासह व्याज द्या

लाभार्थ्यांची कोणतीही चूक नाही. त्यांनी पैसे वेळेत जमा केले आहेत. यात म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे या योजनेतील लाभार्थ्यांना फ्लॅट उशिराने मिळणार आहे. जमा असलेल्या लाभार्थ्यांच्या पैशावर व्याज द्यावे, अशी मागणीही लाभार्थ्यांनी केली आहे.'' सुनीता जोशी, लाभार्थी
संघर्षामुळे आडकाठी

म्हाडाने महापालिकेची परवानगी गृहीत धरत या फ्लॅट स्कीमचे बांधकाम ऑक्टोबर २०१२ मध्ये सुरू केले गेले. पण, महापालिकेने मंजुरी नसल्याचे कारण पुढे करत येथील बांधकाम जानेवारी २०१४ मध्ये थांबवले आहे. याचा नाहक फटका येथील लाभार्थ्यांना बसला आहे. महापालिका आणि म्हाडा यांच्या संघर्षात या ६० गाळेधारकांचे घरांचे स्वप्न स्वप्नच राहण्याच्या स्थितीत आहे.