अकोला- डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी आयुक्त दर्जाचा पोलिस अधिकारी प्लँचेटचा वापर करतो. यामुळे महाराष्ट्र पुरोगामी असल्याची लाज वाटते. ज्यांनी तसा प्रयत्न केला त्यांची चौकशी झालीच पाहिजे, या मागणीचा पाठपुरावा करत आहोत, अशी माहिती अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी रविवारी दुपारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
मराठा मंडळाच्या सभागृहात शनिवार, रविवार, असे दोन दिवस अंनिसची राज्यस्तरीय बैठक झाली. बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती पाटील यांनी दिली. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्रे भरून घेत आहोत. तसेच विधानसभेत जे विजयी होतील, त्यांनी फटाके फोडून प्रदूषण वाढवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्मदिवस यापुढे युवा संकल्प दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. नोव्हेंबरला औरंगाबाद येथे महाराष्ट्रव्यापी युवा संकल्प परिषद होणार आहे, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला वर्ष होऊनही आरोपींचा तपास लागलेला नाही. त्यामुळे दर महिन्याच्या २० तारखेला राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात िनषेध करण्यात येणार आहे.
जात ही अंधश्रद्धा असून, तिच्या उच्चाटनासाठी राष्ट्रीय पातळीवर चयन-निवडीचा अधिकार कृतीत आणण्यासाठी राष्ट्रीय समन्वय मंच उभारण्यात येत आहे. नोव्हेंबरला पुण्यात बैठक होणार आहे, फुले जयंती राष्ट्रमाता जिजाऊ जयंती दरम्यान महिला जागरणाचे कार्यक्रम, युवती मेळावे घेण्यात येतील. तसेच २६ ते ३० जानेवारी दरम्यान संविधान बांधिलकी महोत्सवाचे आयोजन केले जाईल, अशी माहितीही पाटील यांनी दिली.
अकोल्याला झालेली विदर्भातील चौथी बैठक होती. विदर्भात अंनिसचे काम वाढवण्याचा प्रयत्न आहे. युवकांना या कार्यात जोडण्याचा प्रयत्न राहील, असेही सांगण्यात आले. समितीचे प्रधान सचिव माधव बावगे, राज्य उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, अॅड. रामसिंह राजपूत, सुशीला मुंडे, अॅड. मुक्ता दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, प्रा. मधू जाधव, श्याम शर्मा, बबनराव कानकिरड पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
तर २१ लाख देऊ, अंनिसचे आव्हान
राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे, अशावेळी ज्योतिष्यांनी उमेदवारांच्या विजयाचे भाकीत करता ते आमच्याकडे पाठवावे. ते खरे ठरले, तर २१ लाख रुपये आम्ही द्यायला तयार आहोत, असे आव्हान अंनिसने दिले आहे. कुठल्याही ज्योतिष्याला आमचा विरोध आहे. परंतु, वैज्ञानिकदृष्ट्या किंवा सांख्यिकी शास्त्राद्वारे होणाऱ्या सर्वेक्षणाला विरोध नाही, असे पाटील यांनी सांगितले.