आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाण्यामध्ये वाढताहेत मलेरिया, हिवतापाचे रुग्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जिल्हाभरात 664 ठिकाणी कायमस्वरूपी डासांची उत्पत्ती होत असल्याने हिवताप व मलेरिया रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, या आजारास आळा घालण्यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने नुकताच गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील 52 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या शहरी आणि ग्रामीण भागात 199 गप्पी मासे पैदास केंद आहेत. यामधून मान्सूनपूर्व आणि मान्सूनमध्ये गप्पी मासे सोडून कीटकजन्य आजारावर आळा घालण्यात येत आहे.

जिल्हा हिवताप कार्यालयांतर्गत एप्रिल ते जुलैदरम्यान जिल्ह्यातील डास उत्पत्ती स्थानांची गणना करून त्यामध्ये गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. त्यामुळे बहुतांश प्रमाणात कीटकांपासून होणार्‍या रोगांवर आळा बसला आहे. परंतु, मागील आठवड्यात हिवतापाचे पाच रुग्ण आढळल्याने गप्पी मासे सोडण्याच्या मोहिमेला गती देण्यात आली आहे.

199 गप्पी मासे पैदास केंद्र :
गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा या जीवशास्त्रीय मोहिमेला 1997 पासून राज्यात प्रारंभ झाला होता. परंतु, आता त्याही समोर जाऊन गप्पी मासे पाळा आणि कीटकजन्य रोग टाळा हे ब्रीद वाक्य घेऊन जिल्हा हिवताप कार्यालय काम करत आहे. त्यानुसार कीटकजन्य आजार होऊच नये, यासाठी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील 52 प्राथमिक आरोग्य केंद्रांंतर्गत 199 गप्पी मासे पैदास केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या निर्मिती केंद्रातून प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या गावांमध्ये नागरिकांना मोफत गप्पी मासे वितरित केले जातात. गप्पी मासे पैदास केंद्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात 154 एवढे, तर शहरी भागात 45 एवढे आहेत.
जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्वाधिक डास उत्पत्ती स्थाने
ज्या ठिकाणी बारोमास साचलेले पाणी आहे, अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. अशा परिसरात नागरी वस्ती असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. जिल्ह्यात 664 एवढी डास उत्पत्ती स्थाने आहेत. त्यापैकी ग्रामीण भागात सर्वाधिक 474, तर शहरी भागात 190 ठिकाणी डासांची नियमित उत्त्पत्ती होत असते. प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, कर्मचार्‍यांकडून सर्व्हे करून या डास उत्पत्ती ठिकाणी गप्पी मासे सोडली जातात. या विभागाकडून महिन्यातून दोन वेळेस गप्पी मासे सोडण्याचा उपक्रम राबवला जातो. आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप कार्यालयांतर्गत वर्षातून नोव्हेंबर आणि मे महिन्यात या उत्पत्ती स्थानांची गणना केली जाते. 664 हे कायमस्वरूपी डासांची उत्पत्ती स्थाने असून, पावसाळ्यात हा आकडा 1100 ते 1200 पर्यंत जातो.

अशी होते गप्पी माशांची पैदास
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात सहा बाय ते चार बायचा साडेतीन फूट खोल खड्डा खोदून त्यामध्ये ब्लिचिंग पावडर न मिसळलेले पाणी सोडले जाते. त्यावर लोखंडी जाळीचे आवरण तयार केले जाते. या पाण्यामध्ये अंदाजे दहा ते 15 नर आणि मादी गप्पी मासे सोडल्या जातात. या गप्पी माशांचे आयुष्यमान 18 महिने ते 3 वर्षे असते. मादी मासे वयाच्या तिसर्‍या महिन्यापासून प्रजनन सुरू करते. एक मादी एकावेळेस पाच ते 50 पिल्ले देते. प्रजनन शक्ती चांगली असल्याने या माशांचे प्रमाण वाढते आणि कीटकवाढीवर आळा बसतो. डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी ही गप्पी मासे सोडण्यात येतात. ही मासे डासांची अंडी खातात. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीवर आळा बसतो.
नागरिकांनो गप्पी मासे मोफत घेऊन जा
जिल्ह्यातील 52 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या 199 गप्पी मासे पैदास केंद्रांमधून गप्पी मासे नागरिकांना मोफत दिल्या जातात. येथील जिल्हा हिवताप कार्यालयांतर्गतही ही सुविधा आहे. नागरिकांनी गप्पी मासे घेऊन जावे आणि कीटकजन्य रोगांपासून आपले आणि परिवाराचे संरक्षण करावे. जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने राबवण्यात येणार्‍या गप्पी मासे पाळा, कीटकजन्य रोग टाळा मोहिमेमुळे हिवताप व मलेरिया यासारख्या रोगांना निश्चित आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. मात्र नागरिकांनीही डासांची उत्पत्ती होईल अशी ठिकाणे नष्ट करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. ’’
एस.के. वानखेडे, प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी, बुलडाणा.