आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलकापुरात महिलांचा उद्रेक; संतप्त महिलांकडूननगरपालिका कार्यालयात तोडफोड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलकापूर- पालिकेच्या अकार्यक्षमतेमुळे तीव्र पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणार्‍या मलकापूर शहरातील महिलांचा अखेर संयम सुटून त्यांनी थेट पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात घुसून साहित्याची तोडफोड केली. एवढय़ावरच न थांबता चर्चेसाठी आलेल्या नगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापतीवर थेट चपला व बांगड्या फेकल्या. बुधवारी दुपारी हा प्रकार घडला.

शहरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, त्यामुळे त्रस्त झालेल्या माता महाकालीनगर, देशपांडे गल्ली, नवा मोहल्ला, दुर्गानगर, लखानी चौक भागातील महिलांनी एल्गार पुकारत थेट पालिकेवर मोर्चा काढला. पाणीप्रश्नी संतप्त महिलांनी थेट पाणीपुरवठा विभागात घुसून तेथील कपाटाची तथा साहित्याची तोडफोड केली. दरम्यान, या महिलांशी चर्चेसाठी आलेले नगराध्यक्ष रशिदखाँ जमादार, पाणीपुरवठा सभापती राजेंद्र वाडेकर यांना आधी फुलांचा हार घालून नंतर संतप्त महिलांनी त्यांच्या दिशेने बांगड्या व चपला भिरकावल्या. सोबतच प्रचंड नारेबाजी महिलांनी केल्यामुळे पालिकेचा परिसर दणाणून गेला होता.

सकाळी 11 वाजेच्या सुमारास माता महाकालीनगरातील महिला मनसे जिल्हा उपाध्यक्ष गजानन ठोसर, शहराध्यक्ष नानासाहेब बाबर, शहर उपाध्यक्ष मंगेश सातव, दीपक बावस्कार, मुरलीधर गरुडकार, कैलास वानखडे, मोहन लटके, मंगेश बावस्कारसह सविता बावस्कार, वंदना लटके, शोभा वाढे, भारती पाटील, निर्मला चित्ते, शकुंतला किन्होळकर, कुसम हटनारे, रेखा बुटकुले, शोभा बुटकुले, कमला वानखेडेसह दीडशे ते 200 महिलांनी थेट पालिका गाठली. सोबतच नगराध्यक्ष रशिदखाँ जमादार यांना पाण्यासाठी वीस-वीस दिवस कसे लागतात, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी जाब विचारला. दरम्यान, देशपांडे गल्ली, नवा मोहल्ला, दुर्गानगर, लखानी चौक भागातील महिलाही पाणीपुरवठा विभागावर धडकल्या होत्या. यामध्ये छाया पाटील, शोभा सातव, शिवसेनेचे किशोर नवले यांचा समावेश होते.