आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malnutrition And Rain, Latest News In Divya Marathi

कुपोषण व पावसाने झाला शिवणी परिसरातील 50 जनावरांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मागील आठवड्यात शहरालगत असलेल्या शिवणी-शिवर तसेच परिसरातील 50 जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, 24 जुलै रोजी उघडकीस आली होती. मृत जनावरांच्या शवविच्छेदनाच्या अहवालानुसार त्यांचा मृत्यू हा कुपोषण व पावसात भिजल्याने झाल्याचे समोर आले आहे.
घटनाक्रम असा आहे की, शहरालगत असलेल्या शिवणी, शिवर, कुंभारी आदी भागांत दूध विक्री करणार्‍या काठेवाडी समूहातील लोकांच्या जनावरांना गेल्या अनेक दिवसांपासून पोषक चारा मिळाला नव्हता, तर संततधार सुरू असलेल्या पावसामुळे त्यांना दोन दिवस चारादेखील मिळाला नव्हता. त्यामुळे ही जनावरे उपाशीपोटी दोन दिवस पावसात भिजल्याने आजारी पडायला सुरुवात झाली. गुरुवारी सकाळी परिसरातील अनेक जनावरे मृत पावल्याचे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. घटनेमुळे पशुधन विकास विभागासह तलाठी यांनी, मंडळ अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे डॉ. डी.जी. पाटील हे घटना स्थळी पोहोचले. डॉक्टरांनी जनावरांच्या आरोग्याची तपासणी करून मृत जनावरांचे शवविच्छेदन केले. या शवविच्छेदनाचा अहवाल सोमवारी उशिरा प्राप्त झाला. या अहवालानुसार जनावरांचा हा मृत्यू चार्‍याअभावी कुपोषण व पावसात दिवस-रात्र भिजल्याने झाल्याचे समोर आले आहे.
अशी झाली तपासणी
लागोपाठ जनावरांचा मृत्यू होत असल्याने परिसरातील गोपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत गुरुवार, 24 जून रोजी सकाळी परिसरातील जनावरे मृत पावल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे सदस्य नीलेश डेहनकार यांनी तलाठय़ांसोबत संपर्क साधला. परिस्थिती लक्षात घेता घटनास्थळी मंडळ अधिकारी ताणाजी सांगळे व सुनील देशमुख, आरोग्य विभागाचे डॉ. डी. जी. पाटील पोहोचले. तपासणीनंतर मृत जनावरांचे विच्छेदन करून सॅम्पल तपासणीसाठी विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेला पाठवण्यात आले होते.
कायद्यात बसले तरच मदत
औद्योगिक वसाहतीमध्ये राहणारे काठेवाडी समूहातील लोक हे महाराष्ट्राचे रहिवासी नाहीत तसेच ते परिसरात अनधिकृतपणे राहतात. त्यामुळे त्यांना मदत मिळणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली असली तरी प्रकरण कायद्यात बसले तरच त्यांना मुहसूल विभागातून मदत मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अहवाल महसूल विभागाला पाठवले
पावसात भिजून मृत पावलेल्या जनावरांच्या शवविच्छेदनाचा तसेच इतर सर्व अहवाल महसूल विभागाला पाठवण्यात आला आहे. अहवालानुसार जनावरमालकांना पुढील मदत देण्याचा निर्णय महसूल विभाग घेणार आहे. अहवालानुसारच मदतीचा निकष ठरणार आहे. डॉ. एम.एस. तुपकर, पशुधन विकास अधिकारी
पावसात भिजल्याने जनावरांचा मृत्यू
संततधार पावसामुळे जनावरांना दोन दिवस चारा मिळाला नाही. तसेच दिवस-रात्र पावसात भिजल्याने ही जनावरे हायपोथर्मियाचे शिकार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये वृद्ध व लहान जनावरांचा समावेश होता. डॉ. डी.जी. पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी.