आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुपोषणमुक्त ग्राम अभियान रखडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यात सर्वत्र राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान राबवले जात असताना अकोला जिल्हा परिषदेला मात्र याचा विसर पडला आहे. महिला व बाल कल्याण विभागाने मागील आठवड्यात नियोजन केले. मात्र, प्रत्यक्षात अभियान राबवण्याबाबत कोणतीही कार्यवाही दिसून येत नसल्याचे चित्र आहे.

महिला व बाल विकास विभागाच्या नियंत्रणात राज्यात सर्वत्र राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागावर हे अभियान राबवण्याची जबाबदारी आहे. 15 नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी आयुक्तांनी योजना राबवण्याबाबत निर्देश दिले होते. मात्र, जिल्ह्यात महिला व बाल कल्याण विभागाकडून अद्यापही या अभियानाला सुरुवात झाली नसल्याचे दिसत आहे. अंगणवाडी, मिनी अंगणवाडीवर हे अभियान राबवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील 878 अंगणवाड्यांपैकी एकाही अंगणवाडीला याबाबतची माहिती अद्यापपर्यंत देण्यात आली नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हे अभियान राबवणारी यंत्रणाच अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे. अभियान राबवण्यासाठी त्याची दोन भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या भागात सर्व संबंधित भागधारकांची जाणीव जागृती करण्यात येणार आहे. दुसर्‍या भागात प्रत्यक्षात कुपोषणमुक्तीसाठी आवश्यक कृती करण्यात येणार आहे. अशाप्रकारे सर्व काही नियोजित असतानाही या नियोजनाकडे महिला व बाल कल्याण विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

योजनेचा कालावधी
कुपोषणमुक्त ग्राम ही संकल्पना अभियानाच्या माध्यमातून स्व-स्पर्धा पद्धतीने राबवण्याचे विचाराधीन आहे. 0 ते 6 वष्रे वयोगटांतील बालकांचे कुपोषण दूर करण्यासाठी राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियान 14 नोव्हेंबर (राष्ट्रीय बाल दिन) ते 7 एप्रिल (जागतिक आरोग्य दिन) दरम्यान राबवण्यात येत आहे.