आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा शाळा - विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घट ; घटले 62 टक्के विद्यार्थी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गाजरगवतासारखे खासगी शाळांचे वाढलेले पीक, पालकांमध्ये शिक्षणाबद्दल वाढलेली जागरूकता आणि इंग्रजीचे फॅड या सर्व प्रकारामुळे महापालिकांच्या शाळा ओस पडण्याच्या मार्गावÞर आहेत. मागील 12 वर्षांत विद्यार्थ्यांच्या संख्येत 62 टक्के घट झाली आहे. हिंदी, मराठी माध्यमाच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.

शहरात 1920 पर्यंत प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी शासनाकडे होती. त्यानंतर नगरपालिकेकडे ही जबाबदारी आली. त्या काळात नगरपालिका व जिल्हा परिषद वगळता इतर शाळा नसल्याने 1954 पर्यंत नगरपालिकेच्या शाळांची संख्या 22 वर गेली. 1971 ला 42 शाळांमध्ये 16 हजार विद्यार्थी, तर 2003 ला 77 शाळांमध्ये 20 हजार विद्यार्थी होते. परंतु, ख-या अर्थाने 1980 पासून नगरपालिका शाळांमधील शैक्षणिक दर्जात घसरण झाली. 1980 पासून खासगी इंग्रजी शाळांमध्ये वाढ झाली. दूरदर्शनमुळे देशासह जगात कसे शिक्षण सुरू आहे, याची माहिती मिळाली आणि पालकांमध्ये खासगी शाळेचे आकर्षण वाढल्याने नगरपालिकांच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या घटू लागली. 2001 ला महापालिका अस्तित्वात आल्यानंतर शाळांमध्ये सुधार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केल्या गेली. काहीअंशी तसे प्रयत्नही झाले. परंतु, दरवर्षी विद्यार्थ्यांच्या संख्येत घटच झाली. ही संख्या वाढवण्याकडे प्रशासन तसेच पदाधिका-यांनी दुर्लक्ष केल्याने आज अनेक शाळा बंद झाल्या आहेत. 2003 ला महापालिकेच्या शाळांची संख्या 77 होती, आता ती 55 वर येऊन थांबली आहे. चालू शैक्षणिक वर्षातही विद्यार्थ्यांची पटसंख्या घटल्याने पुढील शैक्षणिक वर्षात काही शाळा बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांमध्ये घट
2014-2015 या शैक्षणिक वर्षात आता पर्यंत मराठी माध्यमाचे 2754, हिंदी माध्यमाचे 937 तर उर्दु माध्यमाचे 3960 असे एकुण 7657 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात मराठी आणि हिंदी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे.

शाळा क्रमांक 26 अपवाद
शिवसेना वसाहतीतील मनपा शाळा क्रमांक 26 मध्ये नवव्या वर्गापर्यंत शिक्षणाची व्यवस्था असुन 450 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत विद्यार्थ्याना शुद्ध पिण्याचे पाणी, संगणक प्रशिक्षणही दिले जाते.

नरेशकुमार पहिले विद्यार्थी
शहरात नगरपालिकेची स्थापना 1864 ला झाली. तर 1885 ला मराठी माध्यमाच्या पहिल्या शाळेची स्थापना झाली. एक एप्रिल 1885 शाळा क्रमांक एक सुरु करण्यात आली. या शाळेतील पहिला विद्यार्थी होण्याचा मान नरेशकुमार शेगोकार यांना मिळाला. तर एक महिन्याच्या अंतरानेच 18 मे 1885 ला शाळा क्रमांक दोन सुरु करण्यात आली. या शाळेचे पहिले विद्यार्थी अशोक खडसे ठरले.

उपस्थिती भत्त्याचा होतो परिणाम
जि.प.तील विद्यार्थ्यांना रोज दोन रुपये उपस्थिती भत्ता मिळतो. मनपा क्षेत्रात जि.प.च्या 14 शाळा आहेत. या शाळेत विद्यार्थ्याना उपस्थिती भत्ता मिळतो. मात्र, शाळांना हा नियम शासनाने लागू केलेला नाही. त्यामुळे याचा परिणाम पटसंख्येवर होत असल्याचे मत शिक्षण विभागातील अधिका-यांनी व्यक्त केले.