आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणाच्या स्वागताची शहरात जय्यत तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भारतीय परंपरेत श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. या महिन्यापासून सर्व सण, उत्सवांना सुरुवात होते. 27 जुलैपासून श्रावण मासाला प्रारंभ होत आहे. श्रावणाच्या स्वागतासाठी अकोलेकर सज्ज झाले असून, प्रत्येक शिव मंदिरात जय्यत तयारी सुरू आहे. हिंदी भाषिकांच्या श्रावणाला सुरुवात झाली असून, त्यांच्या विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. या वर्षी पाच सोमवार आले असून, पोळ्याचा सण श्रावण सोमवारी आला आहे. हा योग तीन वर्षांनंतर आला आहे.

राणीसती धाम
राणीसती धाम येथे श्रावण झुल्याची जोरदार तयारी सुरू आहे. 30 जुलै रोजी श्रावण तीज येत असून, या दिवशी महिला झुले खेळतात. त्यामुळे मंदिराच्या परिसरात जवळपास 60 झोके बांधण्याची तयारी सुरू आहे. याशिवाय नागपंचमीला झांकी व उत्सव होणार आहे. दर सोमवारी शिव मंदिरात सकाळी 7.30 वाजता अभिषेक व सजावट करण्यात येत आहे. श्रावण महिन्यात मंदिरात महिला मंडळाचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राणीसती सेवा समितीचे अध्यक्ष जगदीश प्रसाद बाछुका, नवीन झुनझुनवाल, सत्यनारायण अग्रवाल, श्यामसुंदर चंगोईवाल, कमलकिशोर गुप्ता, मनीष बाछुका, सज्जन अग्रवाल, राममनोहर लोहिया, शशिकांत खेतान, विमला रुंगटा, लता बाछुका, मंजुश्री झुनझुनवाल, शोभा लोहिया पर्शिम घेत आहेत.

श्री राजराजेश्वर मंदिर
शहराचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणमासानिमित्त तयारी सुरू आहे. सुरक्षा आणि स्वच्छता यावर विशेष भर देण्यात आले आहे. मंदिराची रंगरंगोटी, काही सुधारणा करण्यात आली आहे. प्रत्येक सोमवारचे नियोजन केले आहे. सोमवारचे मंदिराच्या गाभार्‍याचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी मंदिरात काही टीव्ही, तर मंदिराच्या बाहेर मोठी स्क्रीन लावण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

कडक सुरक्षा : सुरक्षेच्या दृष्टीने 4 सीसीटीव्ही कॅमेरे वाढवण्यात आले असून, आता 12 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा वॉच राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुरक्षा रक्षकांची संख्यादेखील वाढवण्यात आली आहे. भाविकांची संख्या वाढत असल्याने पोलिस यंत्रणादेखील वाढवण्यात येणार आहे. शिवाय महिला सुरक्षा रक्षकांची विशेष टीम येणार आहे. विशेष नियंत्रण कक्षाची निर्मिती होणार आहे.

स्वच्छतेवर भर : सोमवारी मंदिरात येणार्‍या भाविकांची संख्या पाहता मंदिरात स्वच्छता ठेवणे अवघड असते. बेल, फूल या निर्माल्यापासून खत तयार करण्यात येणार आहे. मंदिरात एका दिवसात जमा होणारे निर्माल्याचे प्रमाण जास्त असते. ते नदीत किंवा इतर ठिकाणी टाकल्याने प्रदूषणदेखील वाढते. त्यामुळे हा निर्माल्य जमा करून गावाबाहेरील शेतात त्याला ठेवण्यात येणार असून, त्यापासून खत तयार करण्यात येणार आहे. सोबतच अभिषेक केलेले दूध, पाणी यांचीदेखील सोय करण्यात येणार आहे. जेणे करून अस्वच्छता होणार नाही.
श्रावण जवळ येत आहे तसे मूर्तिकारांच्या कामाला वेग आला आहे. भगवान शंकराच्या विविध रूपांतील मूर्ती तयार झाल्या असून, आता त्यांना रंग दिला जात आहे. मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शिवाच्या लहान, मोठे विविध आकाराच्या, अनेक रूपांनी बाजार सजले आहे.

शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी पॅकेटचे दूध वापरले जाते. यात केमिकल असल्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिंडीवर होत आहे. तसेच अनेक लोक दुधात साखर टाकत असल्यामुळे त्याचे घर्षण होऊन, शिवलिंगाची झीज होत आहे. मूळ शिवलिंगाच्या सध्या 25 टक्के झीज झाली आहे. शिवाय त्यावर बारीक तडादेखील जात आहे.