आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीच्या हॉल तिकीटांमध्ये चुका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी हॉल तिकीट फार महत्त्वाचे असते. या हॉल तिकीटवरील एक-एक आकडा पाहून विद्यार्थी उत्तरपत्रिकेवर त्याचा क्रमांक टाकत असतात. मात्र, परीक्षा बोर्डानेच जर नंबर चुकवले असतील किंवा काही त्रुटी ठेवल्या असतील, तर विद्यार्थ्याचे नुकसान होऊ शकते. अशीच चूक बारावीच्या परीक्षा बोर्डाने केली असून, बहुतांश विद्यार्थ्यांचे रोल नंबर अपूर्ण दिले आहेत.


यंदा पहिल्यादांच बारावी परीक्षेसाठीचे अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने भरून घेतले गेले. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या अर्जामध्ये चुका राहणार नाहीत, अशीच खात्री होती. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रामध्ये सर्वाधिका चुका या रोलनंबरच्या बाबतीत परीक्षा बोर्डाकडून झाल्या आहेत. आकड्यामध्ये जे रोल नंबर नमूद केले तेच रोलनंबर हे अक्षरामध्ये अपूर्ण छापून आले आहेत. शेवटचे अक्षरच हॉल तिकीटवर दिसत नसल्याने कोणता रोलनंबर खरा हे समजण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. असे असले तरी ही घोडचूक बोर्ड स्वीकारायला तयार नाही, तर आकड्यातील रोलनंबरच खरा असल्याचे परीक्षा बोर्डाकडून सांगण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांचा फोटो, नाव, बैठक क्रमांक, विषय सांकेतांक यांसारख्या अनेक चुका विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रामध्ये आलेल्या आहेत. अनेक बाबी मुद्रित करायच्या राहून गेल्या, असे उत्तर परीक्षा मंडळाकडून देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षांचे साहित्य छपाईसाठी सप्टेंबरमध्ये राज्य मंडळाने निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी आलेल्या ई-निविदांपैकी दिल्ली येथील कंत्राटदाराची निविदा मंजूर केली. त्यानंतर दिल्लीच्या कंत्राटदाराला परीक्षा साहित्य छपाईचे कंत्राट देण्यात आले. मात्र, भाषेतील तफावतीमुळे या साहित्यात मोठय़ा चुका आढळल्या आहेत. बारावीच्या प्री-लिस्टमध्ये असलेल्या चुका दुरुस्त केल्यानंतरदेखील मूळ आवेदनपत्रात चुकाच चुका आहेत. तसेच इयत्ता दहावीच्या प्री लिस्टही मुख्याध्यापकांच्या हाती पडल्या आहेत. मात्र, त्या लिस्टमध्येही चुका आहेत. या चुका सावरत असताना शाळांना नाकीनऊ येत असून, चुकांमुळे विद्यार्थीही भयभीत झाले आहेत. दरम्यान, दिल्ली येथील एजन्सीला छपाईचे कंत्राट दिल्याचे राज्य परीक्षा मंडळाने मान्य केले आहे. तसेच हे कंत्राट पंधरा महिन्यासांठी आहे. दुसरीकडे विभागीय शिक्षण मंडळाने या चुकांची दुरुस्ती करण्याचे आदेश शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत.


चुकांसाठी शाळांना जबाबदार धरू नये
आवेदनपत्रातील चुका संबंधित कंपनीने केल्या आहेत. त्यामुळे या चुकांसंबंधी शाळांना जबाबदार धरू नये. तसेच परीक्षा मंडळाने शाळांवर दंडात्मक कारवाई करू नये. शत्रुघ्न बिरकड, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ, अकोला.
हॉल तिकीटवर रोल नंबरचे शेवटचे अक्षर उमटले नाही. ही फार मोठी चूक नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर पेनाने ते अक्षर लिहावे किंवा परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करावे. जे. एस. अभ्यंकर, सहसचिव विभागीय परीक्षा माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, अमरावती.


काय आहेत चुका?
विद्यार्थ्यांचा फोटो, नाव, बैठक क्रमांक, विषय सांकेतांक या चुकांमुळे विद्यार्थी चिंतित आहेत. या चुकांची दुरुस्ती परीक्षा मंडळाने कोणताही दंड न घेता करून द्यावी, कारण विद्यार्थ्यांच्या आवेदनपत्रातील चुका त्यांना भविष्यात त्रासदायक ठरू शकतात.