आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दुनियादारी’तील बॅगची एंट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - चित्रपटातील नायक-नायिकांनी वापरलेले ड्रेस, बॅग याकडे तरुणाईचे बारीक लक्ष असते. त्यामुळे या वर्षी कॉलेजमध्ये पहिल्या दिवसापासूनच दुनियादारी चित्रपटातील ‘झोला पॅटर्न बॅग’ने एंट्री केली आहे.

‘झोला पॅटर्न’ हा काही वर्षांपूर्वीचा असला, तरी ‘दुनियादारी’, ‘टाइमपास’ या चित्रपटांमुळे ती क्रेझ परत आली आहे. कॉलेज, मैत्री यावर आधारित असलेल्या या चित्रपटांचे नुसते कथानक पसंतीस उतरले नाही, तर त्यातील फॅशनचेही अनुकरण केले जात आहे. दुनियादारीत मिनू आणि टाइमपासमध्ये प्राजक्ताने वापरलेले ‘झोला पॅटर्न बॅग’ तरुणींमध्ये लेटेस्ट फॅशन आहे. साध्या लूकवरदेखील उठावदार दिसणा-या या बॅगने तरुणींना भुरळ घातली असून, कॉलेजमध्ये ‘झोला बॅग’ दिसत आहे. बॅगवर पैठणी, गढवाल, पेशवाई या साड्यांवर असलेल्या काठांचा वापर करून आकर्षक लूक दिला आहे. लाल, गुलाबी, पर्पल, ब्ल्यू, ब्लॅक अँड व्हाइट या शेडमधील बॅगचे आकर्षण आहे.

बाजारात विविध प्रकारच्या डिझाइन उपलब्ध
लांब बंदाप्रमाणेच लहान आकारातील झोला बॅगदेखील बाजारात आले आहे. फुलांची डिझाइन व मल्टी कलरमधील या बॅगचे मण्यांचे हॅन्डल आहे. लहान मोठे विविध आकारातील, रंगातील मण्यांचा वापर केल्याने फॅशनेबल लूक आला आहे. आकाराला मोठ्या असल्याने यामध्ये बरेच साहित्य ठेवल्या जाते. या बॅग तरुणींप्रमाणेच नोकरी करणा-या महिलांच्या देखील पसंतीस उतरत आहेत. बाजारात 200 ते 400 रुपयांपर्यंतच्या अनेक डिझाइन उपलब्ध आहेत. कोणत्याही ड्रेसवर सूट करणा-या ‘झोला बॅग’ची क्रेझ परत एकदा आली आहे.

साइड बॅगची क्रेझ
कॉलेजमध्ये सॅकची चलती कमी होत असून, साइड बॅगची क्रेझ वाढत आहे. मुलींमध्ये पारंपरिक लूक असलेला झोला बॅग, तर थ्री इडियट्स या चित्रपटात आमीर खानने वापरलेली वन साइड बॅगची फॅशन मुलांमध्ये आहे. फ्लिप आणि विदआउट फ्लिपच्या या वन साइड बॅग वापरण्यास सोयीच्या आहेत. पावसाळा असला तरी सॅकऐवजी कॉटनच्या साइड बॅगला विशेष पसंती मिळत आहे.