आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळचेपी : मराठी सिनेमा दाखवण्यासाठी मल्टिप्लेक्समध्ये ‘नाटक’बाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइम देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने एप्रिलला घेतला. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी तशी घोषणाही केली. मात्र, मल्टिप्लेक्स सिनेमागृहांकडून मराठीला दिली जाणारी सापत्न वागणूक कायम असून, असलेले शोही रद्द केले जात आहे. त्यासाठी प्रेक्षकांनाच प्रेक्षक नाहीत, असे सांगण्याचे नाटकही केले जात आहे. परिणामी, मराठी सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांना आल्या पावली परत जावे लागत आहे.
मागील चार वर्षांपासून मराठीमध्ये एकापेक्षा एक सरस चित्रपटांची निर्मिती होत आहे. गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘कोर्ट’ने तर राष्ट्रीय स्तरावरच्या सुवर्ण कमळासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांवर मराठीचे नाव कोरले आहे. यासारख्याच अनेक दर्जेदार मराठी चित्रपटाची निर्मिती हाेत आहे. मात्र, अर्थकारण आणि मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये मिळणाऱ्या सापत्न वागणुकीमुळे प्रेक्षकांना या दर्जेदार कलाकृतींना मुकावे लागत आहे. परिणामी, प्रेक्षक असूनसुद्धा मराठी चित्रपटाचा शो रद्द केला जात आहे. राज्य शासनाच्या आदेशानंतरही मराठी सिनेमांची गळचेपी सुरूच आहे.

ऑनलाइन बुकिंगही बंद : मल्टिप्लेक्समधल्या कुठल्याही चित्रपटाची ऑनलाइन बुकिंग केली जाते. पण, शहरातील सिनेमागृहात मराठी चित्रपटासाठी ऑनलाइन बुकिंग बऱ्याचदा हाेत नाही. शोच्या एक अगोदरची किंवा दिवस अगोदरही ऑनलाइन बुकिंग करण्याचा प्रयत्न केला तर बुकिंग हाेत नाही. त्यामुळे प्रेक्षकांना नाइलाजाने बुकिंगसाठी सिनेमागृह गाठावे लागते. पण, तिथेही शो रद्द केला, असे सांगितले जाते.

नाइलाजाने जावे लागते परत : कोणत्याही चित्रपटाच्या तिकिटासाठी एकाच वेळी ५० ते ६० प्रेक्षकांच्या रांगा लागण्याचे दृश्य आता दुर्मिळ झाले आहे. अपवादाने वर्षातून एखाद्या दुसऱ्या चित्रपटासाठी हल्ली अशी गर्दी होते. त्यामुळे चित्रपट सुरू होण्याच्या १५ ते २० मिनिटांपूर्वी पंधरा ते वीस प्रेक्षक तिकीट घेण्यासाठी येतात. त्यांनी मराठी सिनेमाचे तिकीट मागितले तर प्रेक्षक कमी आहेत, शो रद्द झाला, असे सांगण्यात येते. त्यांच्या पाठाेपाठ आलेल्या इतर प्रेक्षकांनाही हेच कारण सांगितले जाते. त्यामुळे नाइलाजाने प्रेक्षकांना परत जावे लागते किंवा इतर चित्रपटाचे तिकीट घ्यावे लागते.

‘काकण’ पाहू शकली नाही

आम्ही तिघी मैत्रिणी ‘काकण’ पाहण्यासाठी शहरातील मल्टिप्लेक्समध्ये तीन वेळा गेलो. पण, तीनही वेळा सिनेमागृहाने प्रेक्षक कमी असल्याचे कारण सांगून शो रद्द केला. वास्तविक पाहता ‘काकण’साठी २५ ते ३० प्रेक्षक येऊन गेले. पण, सर्वांना एकच कारण सांगितले जात होते. यामुळे आम्हास काकण पाहायला मिळाला नाही.'' संगीताखिराडे, विद्यार्थिनी.

‘कोर्टा’ची पायरीच चढू दिली नाही

शहरातील मूर्तिजापूर रस्त्यावर असलेल्या मल्टिप्लेक्समध्ये १७ एप्रिलला ‘कोर्ट’चे पोस्टर्स झळकले. पुरस्कारामुळे या चित्रपटाविषयी उत्सुकता होती. त्यामुळे पहिल्याच शोला आमच्या आठ जणांच्या ग्रुपने हजेरी लावली. पण, प्रेक्षक कमी आहेत, हे कारण पुढे करून तिकीट दिले नाही. हाच अनुभव सलग पाच दिवस आला. एकूणच काय तर आम्हाला ‘कोर्टा’ची पायरीच चढू दिली नाही. त्यामुळे ग्रुपमध्ये नाराजी पसरली. '' वैभव हेंबाडे, विद्यार्थी, पीडीकेव्ही, अकोला.

मल्टिप्लेक्सचालकांचा खळ्ळखट्याक करू
प्रेक्षक असूनसुद्धा मराठी सिनेमा दाखवला जात नसेल तर हा मोठा अन्याय आहे. यासंदर्भात मल्टिप्लेक्सचालकांनी सकारात्मक निर्णय घेतल्यास मनसे स्टाइल खळ्ळखट्याक आंदोलन करण्यात येईल.'' शंकरराववाकोडे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

एकीचा दिसून आला अभाव

मल्टिप्लेक्सकडून मराठी सिनेमाला दिल्या जाणाऱ्या सापत्न वागणुकीला मराठी निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांमधील एकीचा अभाव आहे. याशिवाय शो रद्द झाला, असे सांगितल्यानंतर मराठी प्रेक्षकही चुपचाप इतर हिंदी चित्रपटाचे तिकीट घेतो, हीसुद्धा या मागची मानसिकता आहे.

प्रेक्षकांचा प्रतिसाद असूनही ‘काकण’ फुटले

दोन आठवड्यांपूर्वी रिलीज झालेल्या ‘काकण’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. असे असताना मल्टिप्लेक्समध्ये शो दिले गेले नाहीत. शिवाय, प्रेक्षकांची मागणी असूनही एकाच आठवड्यात तो उतरवला. यासंदर्भात चित्रपटाच्या दिग्दर्शक क्रांती रेडकर यांनी तक्रारही केली होती. पण, उपयोग झाला नाही.

‘हण्ड्रेड करोड क्लब’ ही संकल्पना मराठीला मारक

गेल्या पाच ते सहा वर्षांत ‘हण्ड्रेड करोड क्लब’ ही संकल्पना उदयास आली. हण्ड्रेड करोड क्लब म्हणजे मल्टिप्लेक्समधल्या चार स्क्रीनवर एकाच वेळी एकच चित्रपट. त्यामुळे आपला चित्रपटही असा झळकावा यासाठी प्रत्येक हिंदी चित्रपट निर्माता धडपडत आहे. परिणामी, मल्टिप्लेक्सवाल्यांना वेगवेगळी आमिषेही दिली जात आहेत. याचा सर्वात मोठा फटका मराठी चित्रपटांना बसत आहे.
बातम्या आणखी आहेत...