आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • March Against Contaminated Water Supply Protest Revenue By Employees

दूषित पाणीपुरवठय़ाविरोधात धडक- महसूल कर्मचार्‍यांतर्फे निषेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-दूषित पाणीपुरवठय़ाचा निषेध नोंदवत कट्यारच्या सरपंच लीलाबाई ठाकरे व नागरिक 5 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यापूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करावा, या मागणीचे निवेदन घेऊन आलेल्या कट्यारच्या सरपंचाचे पुत्र गोपाल ठाकरे यांच्याशी महिला लिपिकाने वाद घालून सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा निषेधही या वेळी कट्यारवासीयांनी नोंदवला.
कट्यारला दूषित पाणीपुरवठा होत असून, तेथे टँकरने पाणीपुरवठा करावा, या आशयाचे निवेदन घेऊन गोपाल ठाकरे व गावकरी 4 फेब्रुवारीला अकोला तहसील कार्यालयात आले होते. त्यांनी लिपिक अन्नपूर्णा टाले यांना निवेदन घेण्याची विनंती केली. अन्नपूर्णा ठाकरे यांनी वाद घालत हे माझे काम नाही, असे त्यांना सुनावले. या बाचाबाचीनंतर अन्नपूर्णा टाले यांनी पोलिस ठाण्यात खोटी तक्रार दिल्याचे गावकर्‍यांनी आज दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित लिपिक महिलेवर कारवाई करावी अन्यथा 10 फेब्रुवारीपासून ग्रामपंचायत कट्यारसमोर ग्रामस्थ उपोषणास बसतील, असा इशाराही निवेदनात दिला आहे.
निवेदन देतेवेळी सरपंच लीलाबाई ठाकरे, अनिता डाबेराव, बुनकाबाई तेलगोटे, कमलाबाई सोळंके, कमलाबाई डाबेराव, सुशीला पवार आदींसह 50 पेक्षा जास्त महिला-पुरुष उपस्थित होते. दरम्यान, भाजप युवा मोर्चाचे रवी गावंडे, अंबादास उमाळे, गोपाल दातकर यांनीही गावकर्‍यांची भेट घेतली. यानंतर न्याय मागण्यासाठी हा मोर्चा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे गेला.
तालुक्यातील कट्यार येथील दूषित पाणी पुरवठय़ाच्या समस्येबाबत निवेदन देण्यासाठी नागरिकांसोबतच्या युवकाने तहसील कार्यालयातील कर्मचारी अन्नपूर्णा टाले यांना मारहाण केली. याचा तहसील कार्यालयाच्या कर्मचार्‍यांनी निषेध केला आहे. या संदर्भात महसूल कर्मचारी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. सरकारी कार्यालयात येऊन कर्मचार्‍यांना धमकावणार्‍या अशा प्रवृत्तींना आळा घातला जावा, अशी अपेक्षा कर्मचार्‍यांनी व्यक्त केली. अशा दबावाच्या परिस्थितीत काम करणे कठीण झाले आहे,असे त्यांचे म्हणणे आहे.