आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात रियादच्या अत्तराची पसरतेय खुशबू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पवित्र रमजान ईदचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, बाजारात खरेदीची लगबग सुरू झाली आहे. या खरेदीच्या यादीत एक हमखास वस्तू असून, सणाच्या आनंदाला चार चांद लावणारी ही वस्तू म्हणजे अत्तर. अकोल्याच्या बाजारात सध्या रियाद येथून आलेले अत्तर खास आकर्षण ठरत असून, जन्नतरुल फिरदोस, अत्तरफूल, सौतुल अरब, रिश्तेका रिचार्ज, कन्नौज यांसारख्या अत्तरांच्या दरवळाने बाजार फुलला आहे.

मुस्लिम बांधवांकडून ईदची तयारी उत्साहात सुरू आहे. 26 वा रोजा झाला असून, आता प्रतीक्षा आहे ती केवळ चांद रात आणि ईदची. सणाच्या या दिवसासाठी कपडे, खाद्यपदार्थ, विविध वस्तू खरेदी करण्यात येतात. बाजारातही खास ईदसाठी नवनवीन वस्तू विक्रीसाठी येतात. त्या खरेदीची लगबग सध्या सुरू आहे. दोन दिवसांसाठी मुक्कामी आलेला पाऊस आता विश्रांती घेत असून, पुन्हा एकदा बाजारात गर्दी होत आहे. रविवार आणि सोमवारी तर तोबा गर्दी होईल, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. ईदनिमित्त इतर वस्तूंसह खास अत्तराचीही खरेदी होते. अत्तरात विविध प्रकार असून, थायलंड, रियाद येथील माल अकोला बाजारात दाखल झालेला आहे.

येथील जुबेरभाई यांना थायलंडचा माल लॉटने मिळाल्याने त्यांच्याकडे 100 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत बुट, चपला, सँडल्स उपलब्ध आहेत. रियादचे अत्तरही खास आकर्षण ठरत आहे. त्यामध्ये जन्नतरुल फिरदोस, अत्तरफूल, सौतुल अरब, रिश्तेका रिचार्ज, कन्नौज, असे विविध प्रकार असून, 20 रुपयांपासून ते 400 रुपयांपर्यंतचे अत्तर उपलब्ध आहे. मंद सुवासापासून ते अगदी दूरपर्यंत दरवळ पसरेल, असे प्रकार आहेत.

अत्तरासोबतच सौदियाचा खजूर बाजारात आहे. अर्धा किलो सीडलेस खजुराचा दर 140 रुपये आहे. सुकामेवा क्वॉलिटीनुसार बाजारात उपलब्ध आहे.

प्लास्टिक व काचेच्या बांगड्या 5 रु., 10 रु. डझन आहेत. विविधरंगी क्लिप्सचादेखील समावेश आहे. फ्रॉक्स 300 रुपयांपासून 1 हजार रुपयांपर्यंत तसेच साड्यांचेदेखील आहे. रेडिमेड कुर्ता-पायजामा 300 रुपयांपासून 2500 रुपयांपर्यंत आहे. कापडाच्या दरात विशेष फरक नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.