आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मटेरिका प्रदर्शनातून कळतो घराच्या स्वप्नपूर्तीचा ‘पाया’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- येथील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर अकोला बिल्डर असोसिएशन ( क्रेडाई)तर्फे आयोजित केलेल्या मटेरिका प्रदर्शनात स्वत:च्या घरकुलाचे स्वप्न पाहणार्‍यांना सर्वच तांत्रिक माहिती एका छताखाली उपलब्ध होत आहे.

स्वत:चे घर असावे, हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. मात्र, यातील अनेक तांत्रिक बाबी किचकट स्वरूपाच्या असतात. त्यामुळे सामान्यांच्या मनात निश्चितच गोंधळ उडतो. घरासाठी पाया असावा की पाइल कॉलम, या प्रश्नापासून ते विद्युत फिटिंग, नळजोडणी कशी असावी, हे प्रश्न डोक्यात फिरत असतात. सोबतच भूमी अभिलेख व फ्लॅट विकत घ्यायचा असल्यास महसूल विभागाकडे करावयाच्या नोंदणी विभागाची माहितीदेखील आवश्यक असते. या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘मटेरिका’मध्ये मिळतात. येथील 160 पेक्षा जास्त स्टॉल्सवर घर कसे असावे, याबाबत इत्थंभूत माहिती दिली जाते. एकेका उत्पादनाचे चार ते पाच स्टॉल्स असल्याने येथे येणार्‍या ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. येथे इलेक्ट्रिकल, प्लम्बिंग, होम अप्लायन्सेस, सिमेंट, दरवाजे, टाइल्स, पेंट्स, वॉटर प्रूफिंग, घराची सुरक्षा उपकरणे, सोलर यंत्रणेची माहिती उपलब्ध आहे. फ्लॅट्स, प्लॉट, दुकान घ्यायचे असल्यास त्याची माहितीदेखील येथे मिळते.

या वर्षी या प्रदर्शनात भूमी अभिलेख कार्यालय व नोंदणी विभागाचे कर्मचारीही ग्राहकांना त्यांच्या विभागाच्या स्टॉलच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत. घराला घरपण यावे, यासाठी येथे सुंदर पोट्रेट आणि पेंटिंगचा स्टॉल आहे. यात वारली पासून, लॅन्डस्केपपर्यंत पेंटिंग्ज उपलब्ध आहेत. या प्रदर्शनात तज्ज्ञांची चर्चासत्रे होत आहेत. त्यात सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, रेडीमिक्स काँक्रीटच्या उपयुक्ततेपासून ते हरितगृहाच्या संकल्पनेची माहिती दिली जात आहे. इलेक्ट्रिक स्विचवर पसंतीचे डिझाइन असावे, अशी अनेकांची इच्छा असते. ती येथे पूर्ण केली आहे. स्विचच्या प्लेटवर आवडणारा फोटो, डिझाइन, टेक्स्चर टाकू शकता,नवे डिझाइन हवे असल्यास तेदेखील बदलू शकता.

मजुरांची सुरक्षाही महत्त्वाची
घर,इमारतीच्या बांधकामादरम्यान मजुरांची सुरक्षा महत्त्वाची असते. यासाठी बांधकाम मजुरांनी सुरक्षेची उपकरणे कशी वापरावी, असा संदेश देणारा स्टॉल अकोला बिल्डिंग, पेंटर बांधकाम मजूर असोसिएशनने लावला आहे. या स्टॉलवर दिनकर निकम व सुरेश मेथे हे मजुरांच्या सुरक्षेचे महत्त्व पटवून देत आहेत.