आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maternal Death News In Marathi, Divya Marathi, Akola, Health

माता मृत्यूचे प्रमाण घटवण्यासाठी सक्षमीकरण महत्त्वाचे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - प्रसूतीदरम्यान, आणि प्रसूतीपश्चात 42 दिवसात महिलेचा मृत्यू झाल्यास त्याला माता मृत्यू म्हणतात. आरोग्याविषयी अज्ञान, अशिक्षितपणामुळे माता मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण महत्त्वाचे आहे. सन 2012-13 मध्ये महाराष्ट्रात 104, तर अकोल्यात 108 माता मृत्यू दर एक लाख जिवंत जन्मामागे होता.
केंद्र सरकारचे आरोग्य मंत्रालय आणि व्हाइट रिबन अलायन्सतर्फे माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृती उपक्रम राबवले जातात. देशात महिलांचे साक्षरतेचे प्रमाण 55 टक्के आहे. महिला सक्षमीकरणाचे प्रमाणदेखील कमी आहे. त्यामुळे महिला आरोग्याविषयी जागरूक असलेल्या दिसून येत नाही. यातूनच प्रसूतीबाबत असलेले अज्ञान, आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष याचे प्रमाण वाढते. आणि त्यामुळे प्रसूतीदरम्यान गुंतागुंत निर्माण होऊन माता मरण पावण्याच्या संख्येत वाढ झालेली दिसून येते.
एका सर्वेक्षणानुसार भारतात दरवर्षी प्रसूतीच्या गुंतागुतींमुळे जवळपास 45 ते 48 हजार माता मृत्यू पावतात. म्हणजेच प्रत्येक दिवशी 800 माता, प्रत्येक तासाला 6 माता, तर प्रत्येक 10 मिनिटाला एक माता मरण पावते. माता मृत्यूचे हे प्रमाण कमी व्हावे, यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन 2005-06 मध्ये जननी सुरक्षा कार्यक्रम आणि 2011 मध्ये जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आले. याचाच परिणाम म्हणजे सन 2009 मध्ये 212 असलेला माता मृत्यू दर 2012 मध्ये 178 वर आला.
मातेचे किंवा तिच्या नातेवाइकांचे दुर्लक्ष, हलगर्जीपणा, रुग्णालयात जाण्याची सोय नसणे, उशिरा पोहोचणे किंवा रुग्णालयात वेळेवर उपचार झाले नाही, तर माता मरण पावतात. इतर कारणांपेक्षा महिलेचे किंवा तिच्या नातेवाइकांच्या अज्ञानामुळे, हलगर्जीपणामुळे मरण पावणार्‍या मातांची संख्या सर्वाधिक आहे. जगातील मातांच्या तुलनेत भारतात 19 टक्के माता मृत्यू होतात. जगात नेपाळमध्ये सर्वाधिक माता, तर चीनमध्ये माता मृत्यूचे सर्वाधिक कमी प्रमाण आहे.
जनजागृती आवश्यक
राज्यात महिला साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शासकीय योजनांची त्यांना माहिती नसते. अनेक ठिकाणी महिला घरीच प्रसूत होतात. त्यामुळे माता मृत्यूचे प्रमाण वाढते. ते कमी करण्यासाठी महिलांना आरोग्याविषयी जागृती आवश्यक आहे.’’ - डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका