आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Medical Field News In Marathi, Health Service, Commission

रुग्णसेवेसाठी डॉक्टरांचे शहरामध्ये ‘कमिशनराज’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - वैद्यकीय सेवेकडे समाजसेवेच्या भावनेतून पाहिले जाते. रुग्ण डॉक्टरला देवाचे रूप मानतात. मात्र, काही डॉक्टरांनी सेवाभाव बाजूला ठेवून वैद्यकीय सेवेचे रूपांतर अर्थार्जनात केल्यामुळे डॉक्टरांकडून रुग्णांची मोठय़ा प्रमाणात लूट होत आहे. एका डॉक्टरकडून रुग्णास दुसर्‍या डॉक्टरकडे पुढील उपचारासाठी पाठवताना त्यातून मोठय़ा प्रमाणात कमिशन उकळले जात आहे. 40 टक्क्यांपर्यंत कमिशन रुग्ण ‘रेफर’ करणार्‍या डॉक्टरांना मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
एका डॉक्टरांकडे रुग्ण उपचार घेत असतो. मात्र, रुग्णास झालेल्या आजारासाठी त्या डॉक्टरचे ‘स्पेशलायझेशन’ झाले नसते किंवा त्याच्याकडे सोयी-सुविधा नसतात. त्यामुळे संबंधित डॉक्टर त्याच्या रुग्णालयात आलेल्या रुग्णाला दुसर्‍या रुग्णालयात ‘रेफर’ करतो. या वेळी ज्या डॉक्टरांनी रुग्ण पाठवला त्या डॉक्टरला कमिशन द्यायचे असल्यामुळे संबंधित रुग्णाकडून उपचारापोटी अधिकचे पैसे उकळले जातात. दोन वर्षांपूर्वी हे कमिशन पाच ते 10 टक्केपर्यंत होते. आता या कमिशनचा रेट 40 टक्केंपर्यंत पोहोचल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे.
ग्रामीण भागातून पाठवलेल्या रुग्णांकडून शहरी भागातील डॉक्टर हमखास कमिशनशी संबंधित असतात. डॉक्टरांनी संबंधित रुग्णालयात पाठवल्यामुळे चांगले उपचार होऊन आपली क ाळजी घेतली जाईल, या आशेवर रुग्ण डॉक्टरांकडे दाखल होतात. मात्र, या रुग्णांकडून उकळलेल्या पैशातून त्या डॉक्टरांचे कमिशन पाठवण्याचा प्रामाणिक धंदा अनेक डॉक्टर करत आहेत. अशा काही डॉक्टरांकडून वैद्यकीय सेवेला हरताळ फासला जात असून, याचा आर्थिक फटका रुग्णांना बसत आहे.
ग्रामीण रुग्णांची होते लूट
अकोल्याबाहेरील डॉक्टरांचे बाहेरील जिल्ह्यातील डॉक्टरांशी लागेबांधे असतात. पेशंट पाठवण्याच्या मोबदल्यात 40 टक्के कमिशन घ्यायचे, असा नियमच आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा, खामगाव, चिखली, मलकापूर तर वाशिम जिल्ह्यातील काही डॉक्टरांकडून अकोल्यातील डॉक्टरांकडे रुग्णांना पाठवले जाते. रुग्णांच्या पैशातूनच ही रक्कम संबंधित डॉक्टरांना दिली जाते. रक्त, लघवी, थुंकी तपासण्यासाठी डॉक्टर संबंधित पॅथॉलॉजीकडेच रुग्णांना पाठवतात. त्यांच्याकडूनही कमिशन पोहोचवले जाते.

सरकारी रुग्णालयातील काही डॉक्टरही नाहीत मागे
बाहेरगावाहून सवरेपचार तथा जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये दाखल होणार्‍या अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये रेफर करण्याचा सल्ला सरकारी रुग्णालयातून काही डॉक्टर देत असतात. त्यांनासुद्धा कमिशन मिळते.

वैद्यकीय क्षेत्र होते बदनाम
4सर्वच डॉक्टर कमिशन देत नाहीत. काही डॉक्टर कमिशन देतात. मात्र, वैद्यकीय क्षेत्राकडे पावित्र्याच्या भावनेने पाहिले जात असल्यामुळे कमिशन घेणे म्हणजे वाईटच आहे. 20 टक्के डॉक्टर कमिशनची देवाणघेवाण करत आहेत. त्यामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र बदनाम होत आहे. डॉक्टरांनी संबंधित रुग्णालयात पाठवले म्हणजे डॉक्टरला कमिशन मिळते हे अनेक रुग्णांनासुद्धा माहीत असते. मात्र, ओळखीमुळे रुग्णांना चांगले उपचार मिळतात, त्यामुळे डॉक्टरांनी घेतलेल्या पैशांसंदर्भात रुग्णाला काहीही देणेघेणे नसते, पण हे चुकीचेच आहे. डॉ. प्रकाश आहेर, अध्यक्ष आयएमए, अकोला