आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक न्याय भवनाबाबत मंत्रालयामध्ये झाली चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मागील सहा वर्षांपासून प्रलंबित असलेला सामाजिक न्याय भवनाचा प्रश्न आगामी काही दिवसांत सुटणार आहे. शहरातील निमवाडीतील गृहविभागाची जागा न्याय भवनासाठी आरक्षित करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी नुकतीच मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत न्याय भवनाबाबत सकारात्मक चर्चा झाली.

सन 2007 पासून सामाजिक न्याय भवनासाठी जागाच मिळत नसल्याने हा प्रश्न रखडला होता. आता मात्र निमवाडी येथील पोलिस विभागाची आठ हजार 938 चौरस मीटर जागा राज्य शासनाने न्याय भवनासाठी आरक्षित केली आहे. त्यामुळे हा प्रश्‍न आता निकाली निघणार आहे. जिल्ह्यातील मागासवर्गीयांना या विभागाच्या योजनाची माहिती व्हावी आणि एकाच छताखाली हा विभाग व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. तसेच गोर गरीब मागासवर्गीयांना योजनाची माहिती होण्यासोबत याचा मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली आहे. त्यांनी न्याय भवनासाठी सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व गृहविभागाच्या अधिकार्‍यांची मंत्रालयात बैठक यापूर्वीच घेतली आहे. यामुळे सामाजिक न्याय भवनाचा तिढा लवकरच निकाली लागणार असल्याचे संकेत आहेत.

शासनाने तत्काळ प्रश्न मार्गी लावावा
सामाजिक न्याय भवन व्हावे, यासाठी गेल्या सात वर्षांपासून आपण शासनाकडे पाठपुरावा करत आहे. शासनाने सामाजिक न्याय भवनाचा प्रश्न मार्गी लावून मागासवर्गीयांना न्याय द्यावा. प्रतिभा अवचार, जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी.

न्याय भवनाची माहिती देण्यात आली
सामाजिक न्याय भवनाचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यात आला आहे. याबाबतची माहिती बैठकीत ठेवण्यात आली होती. सामाजिक न्यायमंत्र्यांना सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अरुण शिंदे, जिल्हाधिकारी.

दहा कोटींची तरतूद
सामाजिक न्याय भवनासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने तब्बल दहा कोटींची तरतूद केली आहे.

यांची होती उपस्थिती : अकोल्यातील सामाजिक न्याय भवन व्हावे, यासाठी मंत्रालयात बैठक पार पडली आहे. या बैठकीला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, पालकमंत्री राजेंद्र दर्डा, सामाजिक न्याय भवनाचे अप्पर मुख्य सचिव, जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची उपस्थिती होती.