आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हाडाच्या निकृष्ट घरांची निर्मिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरातील रामनगरात म्हाडांतर्गत सुरू असलेले घरांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी या बांधकामाला काही लाभार्थींनी भेट दिली असता हा गैरप्रकार त्यांच्या निदर्शनास आला. विशेष म्हणजे बांधकाम सुरू असताना म्हाडाचा एकही अभियंता उपस्थित नसल्याचेही या वेळी निदर्शनास आले. मागील वर्षी सुरू झालेले हे बांधकाम वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचेही संथगतीमुळे दिसून येत आहे.

नागरिकांना मुबलक आणि दज्रेदार घरे उपलब्ध करून देण्याची योजना म्हाडाकडून विविध ठिकाणी राबवली जाते. शहरातील रामनगर येथेही अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणारी गृहनिर्माण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून दज्रेदार घर मिळण्याची लाभार्थींची अपेक्षा आहे.

रामनगरात मध्यम उत्पन्न गटातील व्यक्तींसाठी म्हाडाच्या माध्यमातून 60 फ्लॅटचे बांधकाम केले जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत यापैकी एकाही फ्लॅटचे काम पूर्ण झाले नसल्याची वस्तुस्थिती आहे. प्रत्यक्षात मात्र नियोजन व देखरेखीअभावी येथील बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची माहिती या योजनेच्या लाभार्थींकडून दिली जात आहे. बांधकामातील सिमेंट व रेतीचे मिर्शण योग्य न राहिल्याने घरांना करण्यात आलेले प्लास्टर अध्र्या तासात अधिकार्‍यांसमोर गळून पडल्याचा प्रकारही समोर आला आहे. भिंतीसाठी वापरण्यात येणार्‍या विटांदरम्यान रेती व सिमेंट भरण्यात येत नसल्याचेही लाभार्थींच्या निदर्शनास आले. बांधकामादरम्यान साहित्याचा योग्य प्रमाणात वापर केला नसल्याची बाबही समोर आली आहे. बांधण्यात येत असलेल्या पाच इमारतींपैकी कोणतीही इमारत अद्यापपर्यंत पूर्ण झाली नाही.

तुम्हाला घर नको का?
बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या लाभार्थींनी काही तक्रार केल्यास येथे असलेले म्हाडाचे अधिकारी ‘तुम्हाला घर नको का’, अशी धमकी देत आहेत. त्यांच्याकडून अशी धमकी कोणाच्या बळावर दिली जाते, असा प्रश्न लाभार्थींकडून उपस्थित केला जात आहे. म्हाडाच्या अमरावती विभागीय कार्यालयाने संबंधितांची चौकशी करावी, अशी मागणीही लाभार्थींकडून केली जात आहे.

तुम्हाला तांत्रिक माहिती नाही
रामनगरात सुरू असलेले काम चांगल्या दर्जाचे असल्याचे मत या ठिकाणी भेट देणार्‍या म्हाडाच्या अभियंत्याने व्यक्त केले. म्हाडाच्या या अभियंत्यांनी ही साइट आपल्या देखरेखीखाली नसल्याचे सांगून स्वत:चे नाव सांगण्यास टाळाटाळ केली. तसेच या कामाची जबाबदारी असलेल्या अभियंत्याचा भ्रमणध्वनी क्रमांक देण्यासही त्यांनी नकार दिला. या ठिकाणी सुरू असलेले काम दज्रेदार असून, तुम्हाला तांत्रिक माहिती नाही, असे म्हणत लाभार्थींची तक्रार खोटी ठरवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला.

बांधकामाच्या गुणवत्तेची चौकशी करा
येथील बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होत असून, एखाद्या भूकंपात ते धाराशाही होण्याची भीती वाटते. येथील लेंटल स्वतंत्रपणे टाकण्यात येत आहे. त्याला कोणताही आधार नसल्याचे दिसते. तसेच बांधकाम नियम डावलून करण्यात येत आहे. या सर्व बांधकामाची चौकशी करावी व बांधकाम योग्यप्रकारे करण्यात यावे. विजयराव देशमुख, लाभार्थी, अकोला

अधिकार्‍यांवर कारवाई करा
या कामावर बालमजुरांचा करणे चुकीचे आहे. या प्रकाराची म्हाडाच्या अमरावती येथील कार्यालयाने दखल घेऊन बालमजुरांचे शोषण थांबवावे. म्हाडाच्या अधिकार्‍यांसमोरच हे शोषण होत आहे. त्यामुळे या अधिकार्‍यांवर प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे. प्रा. किशोर वाहणे, सदस्य, बालकल्याण समिती, अकोला

बांधकामासाठी बालमजुरांचा वापर
रामनगरातील म्हाडाच्या बांधकामावर बालमजुरांना राबवून घेतले जात असल्याचे दिसत आहे. म्हाडाच्या अभियंत्यांसमोर येथे बालमजूर काम करत आहेत. मात्र, अधिकार्‍यांकडून याबाबत दखल घेतली जात नसल्याचा अनुभव लाभार्थींना येत आहे. त्यामुळे अभियंत्यांची या संबंधित कंत्राटदारासोबत हातमिळवणी असल्याची शक्यता लाभार्थींकडून व्यक्त केली जात आहे.