आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थलांतरित पाहुण्यांना अन्नाचा तुटवडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिम - हिवाळा सुरू होताच सायबेरियन पाणपक्षी महाराष्ट्रात येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे पक्षी अभ्यासकांना पर्वणी मिळत आहे. पण, शेतीपिकांवर फवारली जाणारी कीटकनाशके, पाटसर्‍याद्वारे नदी, तलावात विविध कंपन्यांचे मिसळणारे दूषित पाणी याचा परिणाम या पाहुण्या पक्ष्यांवर होत आहे. कीटकनाशकांमुळे जलकीटक आणि जलीय वनस्पतींची संख्या कमी होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात या पक्ष्यांचे अन्न कमी झाले आहे. येत्या काही वर्षांत याचा परिणाम त्यांच्या स्थलांतरावर होऊ शकतो.

सायबेरियामध्ये हिवाळ्यात खूप बर्फ पडते. बर्फाखाली जमीन पूर्णत: झाकली जाते. त्यामुळे अन्नाच्या शोधासाठी तेथील पक्षी दरवर्षी महाराष्ट्रामध्ये येतात. या वर्षी हिवाळ्याच्या सुरुवातीपासून या पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. जानेवारीपर्यंत त्यांचा येथे मुक्काम असणार आहे. उन्ह वाढायला लागताच फेब्रुवारीमध्ये ते परत मायदेशी जाणार आहेत. परंतु, वाढत्या कीटकनाशकांच्या वापरामुळे त्यांचे अन्न तर कमी झालेच आहे, शिवाय या पक्ष्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. परिणामी, या पक्ष्यांच्या स्थलांतराची संख्या रोडावत आहे.

रात्रीच करतात प्रवास
सायबेरिया ते भारत हा सुमारे सात हजार किमीचा प्रवास आहे. हे अंतर कापण्यासाठी हे पक्षी रात्रीच प्रवास करतात. कारण रात्री तापमान कमी असते आणि त्यांची शिकार करणारे भारतीय पक्षी रात्री झोपलेले असतात. शिवाय, रात्री लुकलुकणार्‍या तार्‍यांमुळे दिशा शोधण्यास त्यांना मदत होते.

वेडर्स आणि हॅसियर्स या कुळातील पक्षी
भारतात येणार्‍या पक्ष्यांमध्ये वेडर्स आणि हॅसियर्स या कुळातील पक्ष्यांचा समावेश आहे. वेडर्स हे जलकीटक खातात, तर हॅसियर्स हे वेडर्सला खातात. सुरुवातीला वेडर्स आणि नंतर हॅसियर्स भारतात येतात.

अन्नसाखळीवर परिणाम
अन्नसाखळीमध्ये पक्ष्यांचे स्थान वरचे आहे. अन्नातून त्यांच्या शरीरात कीटकनाशके गेले तर त्यांचे पंख, मसल कमकुवत पडत जातात आणि त्यांच्या उडण्यावर परिणाम होतो. याचा परिणाम पुढे सर्व अन्नसाखळीवर होतो. डॉ. नीलेश हेडा, पर्यावरण तज्ज्ञ, कारंजा लाड.