आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध संघ कमकुवत; व्यवसायाला खीळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यात सध्या अडीच लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत दुधाचा तुटवडा भासत असल्याने दररोज ६५ हजार लिटर दूध बाहेरून येत आहे. ही विषमता दूर करण्यासाठी दूध उत्पादक संस्था, संघ यांना मजबूत करावे लागेल. गुजरातने दुग्ध विकासाबाबत केलेली प्रगती ही महिलांच्या सहभागातून दिसून येते, असे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी नीलेश बंड यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

अकोला जिल्ह्याची गरज ३ लाख ६३ हजार लिटर दुधाची आहे. यातील १५ ते २० टक्के लोक परगावी राहतात, असे गृहीत धरल्यास तसेच १० हजार लिटर परगावी जाते. २० ते ३० हजार लिटर दुधावर प्रक्रिया केली जाते. म्हणजेच अडीच लाख लिटर दूध आवश्यक आहे. दुधाची तूट भरून काढण्यासाठी शेतकर्‍यांनी दुग्ध व्यवसायाची जोड देण्याची गरज आहे. इतकेच नाही तर सधन शेतकरी पुढे आल्यास त्यांचाही हातभार दुग्धोत्पादन वाढीसाठी होऊ शकतो. बचत गटांच्या महिला या व्यवसायात आल्यास त्यातूनही चांगले काम भविष्यात उभे राहू शकेल, असा वशि्वासही बंड यांनी व्यक्त केला.

पाणीचार्‍याअभावी यंदा गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. दुधाची घसरण होण्याला प्रमुख कारण म्हणजे लोकांची मानसिकता बदलली आहे. मजूर मिळत नाही तसेच घरातील युवकांना गायी-म्हशींचे काम करण्यात रस वाटत नाही. व्हाइट कॉलर कामांच्या मागे ती धावलेली दिसतात. याबाबत जी पाहणी झाली त्यामध्ये मजुरांची समस्या समोर आली आहे. गावागावातील संस्था, संघाचे कमकुवत झालेले जाळे मजबूत झाल्यास या व्यवसायाला चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त ती मानसिकता तयार करावी लागेल. शासकीय दरामध्ये दूध संस्था दूध देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा कल खासगीरीत्या विक्रीकडे असतो. शासनाचा गायीच्या दुधाचा दर २० रुपये तर बाजारात ३० ते ३५ रुपये, म्हशीचे शासकीय दूध २९ रुपये तर बाजारात ५० ते ५५ रुपये लिटर दराने विकले जाते.

मात्र, संस्थांकडून दूध घेताना शासकीय स्तरावर त्याची काटेकोर तपासणी केली जाते. दुधाची भेसळ, पाण्याचा वापर या बाबी तपासल्या जातातच. त्यामुळेही दूध उत्पादक इकडे येत नाहीत, असेही बंड यांनी सांगितले.