आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minister Eknath Khadse Nephew Harish Arrest Warrant

पुतण्यामुळे काका अडचणीत, मंत्री खडसेंचा पुतण्या हरीशविरुद्ध अटक वाॅरंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राष्ट्रवादी काँग्रेसच्या काका-पुतण्यावर कायम आरोप करणारे राज्याचे महसुल आणि कृषीमंत्री आता स्वतःच्या पुतण्यामुळे अडचणीत आले आहेत. खडसे यांचा पुतण्या हरीष खडसे विरोधात अकोट न्यायालाने अटक वॉरंट जारी केले आहे.

अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बांधकामातील 80 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल करून समन्स बजावल्यानंतरही न्यायालयात हजर न झाल्या प्रकरणी अकोट न्यायालयाने गुरुवारी राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांचा पुतण्या हरीश खडसे याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. दरम्यान, या प्रकरणातील अन्य तीन आरोपींना मात्र अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यामध्ये बाजार समिती सभापती रमेश हिंगणकर, मोहसीन बेग मिर्झा, अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील कंत्राटदार सुनील अग्रवाल यांचा समावेश आहे. अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आेटे, टिनशेड आदी बांधकामासाठी आलेल्या निधीत अफरातफर करत 80 लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप हरीश खडसेंसह उपरोक्त चौघा जणांवर आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बांधकामातील 80 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी अकोट पाेलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल करून हजर राहण्याबाबत सूचित केले होते. मात्र, हरीश खडसेने याकडे दुर्लक्ष करत न्यायालयात हजर राहण्याचे टाळले. त्यामुळे न्यायालयाने हरीश खडसेविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.
काय आहे प्रकरण
अकोट बाजार समितीने अंतर्गत रस्ते, सरंक्षण भिंत, टीनशेड, कार्यालय नूतनीकरण अशा अनेक कामांसाठी 2011 मध्‍ये 2 कोटी 97 लाखांच्या कामांच्या निविदा मागविल्या होत्या. याचे कंत्राट अकोल्यातील 'मेसर्स के.जी.खडसे अँड असोसिएट्स' या खासगी फर्मला देण्यात आले. ही फर्म राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाऊ आणि पुतण्याच्या मालकीची आहे. यामध्ये सुनीलकुमार अग्रवाल या कंत्राटदाराकडून कामे करून घेणे आणि त्याची गुणवत्ता तपासणे याची जबाबदारी खडसे यांच्यावर होती. मात्र, खडसे यांनी कंत्राटदाराला हाताशी धरून 2.97 कोटींच्या कामांपैकी तब्बल 1.44 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप बाजार समितीचे सचिव राजकुमार माळवे यांनी केला. अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने केलेल्‍या या कामाचे सर्वेक्षणातून तब्बल 1.44 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे यातील 80 लाखांची कामे फक्त कागदोपत्री झाल्याचे उघड झाले, तर 64 लाखांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याचेही अहवालात नमूद आहे.