आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजी-माजी आमदार महाविद्यालयात; निवडणुकीपूर्वी पदवीचे वेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- राजकीय नेत्यांसाठी विधानसभा निवडणूक ही एक परीक्षा असते. या परीक्षेला अद्याप वेळ आहे. त्यामुळे जिल्हय़ातील आजी-माजी आमदारांनी पदवी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेसाठी हे दोन्ही लोकप्रतिनिधी निवडणुकीपूर्वी एकाच खोलीत परीक्षा देतील. यासाठी त्यांनी येथील एका महाविद्यालयात मुक्त प्रवेश घेतला आहे. दरम्यान यातील एका नेत्याने या वृत्ताला दुजोरा दिला.

जीवनभर माणूस शिकत असतो, अशी शिकवण आहे. नेते कधी कार्यकर्त्यांकडून तर कधी वरिष्ठ नेत्यांकडून शिकतात. आमदार होण्यासाठी भविष्यात पदवीधर ही अट आल्यास व राजकीय पक्षांनी तशी ती निश्चित केल्यास उगाच अडचण नको, म्हणून हा सर्व खटाटोप आहे.

येथील एका विधानसभा मतदारसंघात नेत्यांचा पूर असल्याने आजी-माजी आमदारांनी शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेतल्याने शैक्षणिक वतरुळात चांगलीच खसखस पिकली. लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या दशेत आल्याने शिक्षकांनादेखील आश्चर्य वाटत आहे. त्यांनीदेखील या लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करणे सुरू केले आहे. पदवीसाठी प्रवेश झाल्याने नव्या उत्साहात लोकप्रतिनिधी शैक्षणिक धडे घेण्यात व्यस्त आहेत.

या प्रवेशामुळे सहयोगी विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. हे दोन्ही लोकप्रतिनिधी थोडेबहुत शिकलेले असून, त्यांना आता पदवीचे वेध लागले आहे. केवळ पदवी प्राप्तीसाठी त्यांचे हे शिक्षण असून, ती लवकर मिळावी, हा त्यांचा एकमेव उद्देश आहे.

राजकीय करिअरमध्ये शैक्षणिक अडथळा येऊ नये, यासाठी या दोन्ही नेत्यांचा प्रयत्न आहे. पदवी प्राप्त करण्याच्या लालसेने शिकणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये एका राष्ट्रीय पक्षाचे माजी आमदार असून, एक अपक्ष लोकप्रतिनिधीने प्रवेश घेतला आहे. काही नगरसेवकांनी देखील अशाच प्रकारे पदवी प्राप्तीसाठी प्रवेश घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कलेत कोण ठरणार गुणवंत
लोकप्रतिनिधी होण्यासाठी शैक्षणिक अट नसल्याने अगदी अंगठाबहाद्दर जनतेचे प्रतिनिधित्व करू शकतो. कारण, त्यापैकी अनेकांना समस्यांची जाण व तळमळ असते. राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत आहे, असे असताना आता राजकीय नेते सुशिक्षित होण्याच्या तयारीत आहे.