आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohim Encroachment Removal,Latest New In Divya Marathi

पोलिस बॅक तर मनपा अधिकारी फ्रंटफूटवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अतिक्रमण हटाव मोहिमेत पोलिसांनी सोमवारी खोडा निर्माण केला. खदान पोलिसांनी कौलखेड मार्गावर अतिक्रमण राबवण्यास पोलिस संरक्षण देण्यास नकार दिला, तर अतिक्रमण हटाव पथकाने स्वत:च्या हिमतीवर महाकाली, जठारपेठ चौकात स्वबळावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवून पोलिस बॅकफूटवर गेले असले तरी आम्ही फ्रंटफूटवरच आहोत, ही बाब सिद्ध केली आहे.
आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर तसेच उपायुक्त दयानंद चिंचोलीकर दिवसभर बैठकांमध्ये व्यस्त असल्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबवायची की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर सायंकाळी 6 वाजता आयुक्तांनी मूर्तिजापूर मार्गावरील महाकाली चौक तसेच जठारपेठ चौकात मोहीम राबवण्याचे आदेश दिले.

आयुक्तांच्या या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करत अतिक्रमण हटाव पथकाने उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे, सहायक नगर रचनाकार संदीप गावंडे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटाव अधिकारी विष्णू डोंगरे, प्रवीण मिर्शा, विजय बडोणे, संजय थोरात तसेच सुरक्षकांनी स्वबळावर ही मोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत महाकाली चौकातील यमुना तरंग या व्यावसायिक संकुलाचे दोन्ही बाजूचे जिने तसेच महाकाली बार, जय हॉटेलचे टिनशेड जमीनदोस्त केले. यानंतर पथकाने आपला मोर्चा जठारपेठ चौकात वळवला. या चौकात पथकाने यापूर्वी दगडफेक झाली असतानाही स्वबळावर भाजी विक्रेते, ऑमलेट विक्रेत्यांच्या चारचाकी गाड्या जप्त केल्या. दरम्यान, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे यांनी जठारपेठ चौक गाठून ही मोहीम जठारपेठ चौक ते सातव चौक मार्गावर चालवली. रात्री 9 च्या सुमारास पथदिवे बंद असताना ही मोहीम चालवल्याने घटनास्थळी एकच गर्दी झाली.