आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाथ मुलांना मिळणार दरमहा सहाशे रुपये लाभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अनाथ मुलांचा शोध घेऊन त्यांना संजय गांधी निराधार योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी महसूल विभाग सरसावला आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या निरीक्षणात तालुक्यात 99 अनाथ मुले, मुली आढळून आले आहेत. या मुला-मुलींना ऑगस्ट महिन्यापासून
दरमहा 600 रुपये आर्थिक लाभ दिला जाणार आहे.

अनाथ मुलांना ब-याचदा भीक मागून पोट भरण्याशिवाय पर्याय राहत नाही. प्रसंगी काही मुले गुन्हेगारीच्या मार्गावर वळतात. हे भयावह वास्तव लक्षात घेऊन अनाथांच्या भविष्याचा विचार करत महसूल विभागाने एक स्तुत्य पाऊल टाकले आहे. अनाथ मुलांना शोधून त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याचा मानस एसडीओ प्रा. संजय खडसे यांचा आहे. या मोहिमेअंतर्गत 18 वर्षांखालील मुलांचा शोध घेण्याचे कार्य 10 ते 25 जूनदरम्यान करण्यात आले. तलाठी व मंडळ अधिका-यांनी केलेल्या सर्वेक्षणातून 99 मुले, मुली अनाथ आढळले आहेत. अशा मुलांची नोंदणी करून घेण्यात आली असून, त्यांच्याकडून संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत.
आता मिळतोय यांना लाभ
शासनाच्या संजय गांधी योजनेचा लाभ विधवा, अपंग, परित्यक्त्या या लाभार्थ्यांना देण्यात येतो. अशाच प्रकारे अनाथ मुलांनासुद्धा योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेतला आहे.

एसडीओंचे ‘सामाजिक दातृत्व’
अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या महसूलचे सामाजिक दातृत्व अभियानामुळे अनाथ मुलांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. दरमहा 600 रुपये का होईना, पण या मदतीतून ते आपल्या उदरनिर्वाहाचा खर्च भागवू शकणार आहे.

ऑगस्टपासून लाभ मिळेल
- जून महिन्यात तालुक्यातील अनाथ मुलांचा शोध घेण्यात आला. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अशा मुला-मुलींचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्यापासून यांना दरमहा 600 रुपये भत्ता मिळेल. प्रा. संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, अकोला