आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरार सुरूच: एक माकड अन् सर्व अकोट भयभीत, एका आठवड्यात १६ जणांना चावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला/अकोट- शहरातील बाजार असो वा शासकीय कार्यालय प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त, अन् अचानक आरडाओरड ‘माकड आले रे....’ अन् अवघ्या काही मिनिटांमध्ये परिसर निर्मनुष्य. ही काही चित्रपटातील कथा नसून अकोटकर गेल्या आठवड्याभरापासून अनुभवत असलेला हा थरार आहे. अन् आजही १३ मे रोजी दिवसभराच्या प्रयत्नानंतर थरारावर पडदा टाकण्यात वन विभागाला अपयश आल्याने नागरिकांमध्ये दहशत आहे.

अकोट शहर सातपुड्यानजीक असल्याने दरवर्षी उन्हाळ्यात येथे माकडांचा हैदोस नागरिकांना काही नवीन नाही. मात्र, यंदा शहरात मेपासून आलेल्या माकडांच्या टोळीतील एक माकड पिसाळले असून, नागरिकांना चावा घेत शहरात हैदोस घालत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील चार ते पाच जणांना चावा घेतल्यानंतरही वन विभाग मात्र सुस्तच होता. दरम्यान, त्याने मंगळवारी १२ मे रोजी न्यायाधीश मोरेंच्या मांडीला चावा घेताच यंत्रणा हलली. अकोला वन विभागाचे पथक अकोट शहरात दाखल झाले. सकाळी ११ वाजता पथकाच्या कार्यवाहीस प्रारंभ झाला. वन कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, माकड पकडण्यात तरबेज असलेले नागरिक यांचेसह ताफा दिवसभर शहरात फिरला. मात्र, माकडाने त्यांच्या हातावर तुरी दिल्या. अखेर सूर्य मावळल्याने मोहीम थांबवावी लागली. तीच परिस्थिती आज १३ मे रोजीलाही अनुभवास आली. सकाळी दहापासून सायंकाळी सहापर्यंत माकडाच्या पिच्छा पुरवणाऱ्या पथकाला माकडाने दगा देत पुन्हा तीन लोकांना चावा घेतला. माकडाच्या चाव्याने जखमी होणारी संख्या वाढती असून, नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
जखमींच्या संख्येत वाढ
आठवडाभरात चवताळलेल्या या माकडाने विमलबाई उके, ताकोतेबाई, रवी पोयाम, चंदनकुमार, गजानन धुमाळे, शाम वाधवानी, हरीश वाधवानी, मधू खोपरखडे, न्यायाधीश मोरे यांना मांडीवर, हातावर, पोटावर चावा घेऊन माकडाने जखमी केले आहे, तर आज १३ मे रोजी दुपारी साडेचारदरम्यान पथक तहसील परिसरात माकडाचा शोध घेत असताना त्याने इंदिरानगर परिसरात धुणे धुणाऱ्या फरनास नाजीम खॉ उर्फ राणी (वय २५) यांना पोटास चावा घेऊन गंभीर जखमी केले. पथकाला माहिती मिळताच पथकाने धाव घेतली. माकडाने पुन्हा ठेंगा दाखवत पळ काढला. त्यानंतर पुन्हा त्याच भागातील अब्दुल शहीद अब्दुल चाँद, शेख आरीफ शेख रसूल यांना चावा घेऊन जखमी केले. एवढेच नव्हे, तर म्हशीलाही चावा घेऊन जखमी केले.
यांचा आहे पथकात समावेश
अकोलावन विभागाच्या फिरत्या पथकात वनपाल एस. डी. देशमुख यांचेसह वनरक्षक के. एम. ताकसुरे, एस. एस. चिरंगे, सुनील तायडे, जे. डी. इंगळे यांचेसह पोलिस कॉन्स्टेबल आर. एस. जंजाळ, सर्पमित्र शेख महम्मद उर्फ मुन्ना आदींचा समावेश आहे. दोन दिवसांपासून पथक मोहीम राबवत असून, उद्या १४ मे रोजी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू होईल.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, रुग्णालयात अँटी रॅबिज लस नाही आणि कोणत्या भागात आहेत सर्वाधिक दहशत...