आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात मतदारसंघामध्ये भाजपचे 52 जण इच्छुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या भाजपने स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहामध्ये जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघासाठी इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या. सातही विधानसभा मतदार संघासाठी एकूण 52 जणांनी मुलाखती दिल्या. यापैकी चिखली विधानसभा मतदार संघामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चांगलीच चुरस असल्याचे स्पष्ट झाले.
भाजपचे पक्षनिरीक्षक तथा आमदार गिरीश महाजन, औरंगाबादचे माजी महापौर तथा सहाय्यक निरीक्षक डॉ. भागवत कराडे, आमदार पांडुरंग फुंडकर, चैनसुख संचती, आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ. संजय कुटे, घनश्यामदास गांधी, नंदू अग्रवाल, मोहन शर्मा, शिवराज जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुलाखती घेण्यात आल्या. सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या मुलाखतीचा सिलसिला दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू होता. दरम्यान, मुलाखतीसाठी येणा-या इच्छूकांनी कुठलेही शक्तीप्रदर्शन करू नये, अशी सक्त ताकीद यावेळी देण्यात आली होती. त्यामुळे इच्छूकांच्या मुलाखती या शांततेत पार पडल्या.

महायुतीत जिल्ह्यातील सातपैकी जळगाव जामोद, खामगाव, मलकापूर आणि चिखली हे चार विधानसभा मतदारसंघ हे भाजपच्या वाट्याला तर बुलडाणा, मेहकर आणि सिंदखेडराजा हे तीन मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहेत. मात्र सातही मतदारसंघासाठी भाजपने इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या. यात जर-तरच्या परिस्थितीची तयारी, असा दृष्टिकोन दिसून येतो.
कमिटमेंट केले नाही : फुंडकर
खामगावमध्ये भाजपतर्फे निवडणूक लढवण्याची इच्छा जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बगाडे, माजी तालुकाध्यक्ष सारंगसिंग चव्हाण आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय ठाकरे यांनी प्रसारमाध्यमाकडे 30 जुलै रोजी व्यक्त केली होती. त्यासंदर्भात आमदार पांडुरंग फुंडकर यांना विचारले असता पक्षातर्फे उमेदवारीचे आपण कोणालाही कमिटमेंट केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारीचा अर्ज करणा-या आपल्या मुलालाही आपण कमिटमेंट केले नसल्याचे महाजन यावेळी म्हणाले.
सिंदखेडराजावर दावेदारी
गेल्या 20 वर्षापासून सातत्याने सिंदखेडराजा मतदारसंघात पराभव पहावा लागणा-या शिवसेनेकडून यावेळी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. वरिष्ठ पातळीवर त्याबाबत चर्चा सुरू असून शिवसेनेसोबत काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सिंदखेडराजाचा प्रामुख्याने समावेश असणार असेही यावेळी भाजपच्या पदाधिका-यांनी स्पष्ट केले.

चिखली हक्काची जागा
महायुतीतील सहकारी पक्षांनी भाजपच्या चिखली जागेवर दावा सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर चिखली हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तो सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे भाजपचे पक्ष निरीक्षक तथा आमदार गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी ही जागा स्वाभिमानीसाठी मिळवण्याचा दावा केला होता.