आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात वर्षांत हृदयविकाराच्या 1,100 यशस्वी शस्त्रक्रिया

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- हृदयविकाराच्या असाध्य असलेल्या 1,100 शस्त्रक्रिया गेल्या सात वर्षांत अमरावतीत यशस्वीरीत्या करण्यात आल्या आहेत. या शस्त्रक्रियांमध्ये जन्मजात व्याधी असलेल्या लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, बायपास प्रकारातील शस्त्रक्रियेची सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने गरजू रुग्णांना मुंबईच गाठावी लागते. जिल्हानिहाय हार्ट केअर सेंटरची कल्पना प्रत्यक्षात अमलात आली तर गोरगरीब रुग्णांना हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी कमी खर्चात आणखी सुविधा उपलब्ध होईल, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

महानगरांमधून उपलब्ध असलेल्या जास्तीत जास्त सोयी-सुविधा अमरावतीत कमी खर्चात उपलब्ध आहेत. मात्र, दारिद्रय़रेषेखाली असलेले परिवारच असे उपचार करवून घेतात, असे चित्र आहे. साने गुरुजी मानव सेवा संघ संचालित संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल आणि रीसर्च इन्स्टिट्यूटमध्ये हृदयशस्त्रक्रिया करण्याची ही सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने या शस्त्रक्रिया करण्यात येतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी 50 लाख लोक हृदयविकाराने मृत्युमुखी पडतात, तर 2015 मध्ये 90 लाख लोक हृदयविकाराने मृत्युमुखी पडतील, असा आरोग्य संघटनेचा अंदाज आहे.अशा परिस्थितीत हृदयविकारावर यशस्वीरीत्या उपचार करणे, ही महत्त्वाची जबाबदारी डॉक्टरांवर आहे.

उपलब्ध सुविधा

1 कोरोनरी बायपास सर्जरी
1 जन्मजात हार्ट डिफेक्ट
1 पेरीफेरल व्हेसल सर्जरी
1 क्लोज हार्ट सर्जरी
1 व्हॉल्व्ह रिपेअर
1 व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट
1 अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी

जीवनदायी योजना

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत हृदयरोगावर उपचार करण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे. दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार योजनेअंतर्गत मोफत केले जातात. संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येतो.