आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माय-लेकीच्या हत्येतील आरोपी मुलास कोठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- आई आणि बहिणीची निर्घृण हत्या करून 18 डिसेंबरपासून फरार असलेल्या आरोपी आदित्य शर्माला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. त्याला 26 जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले असता, 31 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

रणपिसेनगरातील रेणुका अपार्टमेंटमध्ये 18 डिसेंबर 2013 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास शिक्षिका ज्योती गोविंद शर्मा आणि त्यांची मुलगी राणी यांच्या डोक्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. गोविंद शर्मा घरी आल्यानंतर फ्लॅटचे दार बाहेरून कुलूपबंद करून हे कृत्य करण्यात आल्याचे उघड झाले होते. गोविंद शर्मा यांचा मुलगा आदित्य घटनेच्या दिवसापासून घरी न परतल्याने त्याचा घातपात झाला असावा, अशी शक्यता सुरुवातीला वर्तवण्यात आली होती. मात्र, घटनास्थळावरील पुराव्यावरून आदित्यने हत्याकांड घडवले असावे, असा संशय व्यक्त करून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

हत्याकांड नैराश्यातून : 23 वर्षीय आदित्य पुणे येथे खासगी कंपनीत नोकरी करत होता. शिक्षणानंतर मनासारखी नोकरी न मिळाल्याने नैराश्यातून हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श यांनी 26 जानेवारीला पत्रपरिषदेत आदित्यच्या तपासाबाबतचा तपशील सांगितला.