आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन चिमुकल्यांची हत्या करून मातेचा आत्महत्येचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - दोन चिमुकल्यांची हत्या करून मातेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची हृदयद्रावक घटना शास्त्रीनगरातील आकाशवाणी केंद्रामागे आभा रेसिडेंसीमध्ये बुधवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

स्वाती अशोक जैन (खटोड) (32) असे या महिलेचे नाव आहे. तिने तनिश (3) आणि तन्वी (6) या दोघांना तोंडावर उशीने दाबून ठार मारले. त्यानंतर स्वत:च्या हाताची नस ब्लेडने कापली तसेच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेच्या वेळी फ्लॅटचा दरवाजा आतून बंद केलेला होता. या फ्लॅटमधून आवाज आल्याने रेसिडेंसीमधील इतर रहिवाशांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश न आल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन पोलिस घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा पोलिसांना हे विदारक दृश्य दिसले. या वेळी दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, महिला जिवंत असल्याचे पाहून पोलिसांच्या टाटा सुमोमध्ये टाकूनच या महिलेला आयकॉन रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह विच्छेदनासाठी सवरेपचार रुग्णालयात पाठवले आहे. या वेळी सिव्हिल लाइन ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावकार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची चर्चा परिसरात होती. मूळचे मेडशी (वाशिम) येथील अशोक खटोड हे मुलांच्या शिक्षणासाठी अकोल्यात आले होते. तनिश, तन्वी या आपल्या दोन मुलांसह जैन दाम्पत्य गेल्या एका वर्षांपासून शास्त्रीनगरातील आभा रेसिडेंसीमध्ये तिसर्‍या माळ्यावर टी-दोन या फ्लॅटमध्ये राहत होते. अशोक जैन (खटोड) अकोल्यातील खासगी नोकरीत कार्यरत आहेत. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिस रात्री उशिरापर्यंत चौकशी करत होते.

उपचार सुरू, प्रकृती स्थिर
स्वाती अशोक खटोड यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.

बुधवारीच घडली घटना
बुधवार अकोलेकरांसाठी दुर्दैवी घटना घेऊन येणारा ठरत आहे. या अगोदर 18 डिसेंबरला बुधवारीच रणपिसेनगरमध्ये शर्मा कुटुंबाकडे दुहेरी हत्याकांड घडले होते. आता पुन्हा शास्त्रीनगरमध्ये 15 जानेवारीला बुधवारीच दोन चिमुकल्यांची हत्या करून मातेने आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, शर्मा कुटुंबातील दुहेरी हत्याकांडाचा तपास लागलेला नसताना शास्त्री नगरात घडलेल्या या घटनेने पोलिसांपुढे नवे आव्हान निर्माण झाले.

दरवाजा तोडण्यासाठी लागला अर्धा तास
फ्लॅटमध्ये काही तरी विपरीत घटना घडल्याची माहिती आभा रेसिडेंसीमधील इतर रहिवाशांना मिळाली. त्यानंतर त्यांच्याकडून फ्लॅटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दरवाजा आतून न उघडल्याने तो तोडण्यात आला. दरवाजा तोडण्यासाठी तब्बल अर्धा तासाचा वेळ गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

नातेवाइकांचा आक्रोष
दोन चिमुकल्यांची हत्या करुन मातेने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांची घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. घटनास्थळावरील दृश्य पाहून पती अशोक जैन यांच्यासह इतर नातेवाईकांनी आक्रोष केला. घटनेपूर्वी स्वाती जैन यांनी फोन केला होता. त्यामुळे बहुतांश नातेवाईक घटनास्थळावर होते. जैन यांना पोलिसांनी माहितीसाठी ठाण्यात आणले होते.

घटनेपूर्वी केला होता पतीला फोन
स्वाती जैन (खटोड) या महिलेने तिचा पती अशोक जैन (खटोड) यांना दुपारी 4 वाजता फोन करून घरी लवकर येण्याचे रागात सांगितले होते. याशिवाय स्वाती यांनी मेडशी येथील आपल्या सासू-सासर्‍यांनादेखील फोन करून अकोल्याला बोलावून घेतले होते. त्यामुळे ते घटनेपूर्वी अकोल्याला येण्यासाठी निघाले होते.

ब्लेडने कापल्या नसा
स्वाती जैन यांनी हाताच्या नसा ब्लेडने कापल्या. त्यानंतर पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पंखादेखील वाकला होता. स्वाती जैन यांचा जीव वाचल्याची चर्चा घटनास्थळी होती.