आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी चोरी; टोळी गजाआड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- दुचाकीची चोरी करणार्‍या तीन जणांना रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी रात्री 11 वाजता अटक केली. या चोरट्यांनी बुलडाणा, वाशिम आणि अकोला जिल्हय़ातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 10 दुचाकी जप्त केल्या आहेत. या तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले असत न्यायालयाने त्यांना 10 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शहरामध्ये दुचाकी चोरीच्या घडलेल्या घटनांवरून रामदासपेठ पोलिसांनी दुचाकी चोरांचा छडा लावण्यासाठी मोहीम राबवली. त्यानुसार पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून तीन सराईत गुन्हेगार काळय़ा रंगाच्या पल्सर गाडीवरून बसस्थानकाकडे जाणार आहेत. त्या माहितीच्या आधारे ठाणेदार विलास पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या चमूने रेल्वेस्थानक चौकात नाकाबंदी केली. या वेळी मोहंमद खलीम उर्फ खंत्या मोहंमद फिरोज (28) रा. वीर लहुजीनगर अकोटफैल, संतोष पुरुषोत्तम एंगड उर्फ शेट्टी (20) रा. पूरपीडित कॉलनी अकोटफैल व रवींद्र अशोक काळे (22) रा. शास्त्रीनगर खदान हे तीन युवक काळय़ा रंगाच्या बजाज पल्सर एमएच 28-2378 या दुचाकीवरून आले. त्यांना पोलिसांनी अडवून कागदपत्रांची मागणी केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच ही दुचाकी त्यांनी शहर कोतवाली हद्दीतील मुंगीलाल बाजोरिया विद्यालयासमोरून चोरल्याचे सांगितले.

या वेळी पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन अटक केली. शुक्रवारी पोलिसांनी या तीनही आरोपींच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरी 10 दुचाकी आढळल्या. त्यामध्ये एलएमएल फ्रीडम सिल्व्हर कलर दुचाकी क्रमांक एमएच 30 - एन 9703, हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस एमएच 30 वाय 588, हिरोहोंडा सीडी डिलक्स एमएच 30 - झेड 8677, बजाज डिस्कव्हर एमएच 30 यू 7582, बजाज डिस्कव्हर एमएच 28 डब्लय़ू 9358, बजाज डिस्कव्हर, एमएच 30 एम 1175 अशा एकूण 10 दुचाकी पोलिसांनी आरोपींकडून जप्त केल्या आहेत. ही कारवाई ठाणेदार विलास पाटील, पोलिस उपनिरीक्षक ए. पी. खोडेवाड, पोलिस हेडकॉन्स्टेबल सुरेश वाघ, पोलिस कॉन्स्टेबल गणेश पांडे, संजय भारसाकळे, आशीष ठाकूर, विजय जामनिक, सुनील टोपकर, संजय कडू, अश्विन सिरसाट यांनी केली.

चोरलेल्या दुचाकी बुलडाणा, वाशिमच्या : या चोरट्यांनी या सर्व दुचाकी गाड्या बुलडाणा, वाशिम आणि अकोला जिल्हय़ातून चोरून आणलेल्या आहेत. त्यांचे क्रमांकसुद्धा या चोरट्यांनी बदललेले आहेत. ज्या दुचाकी बुलडाणा व वाशिम जिल्हय़ातून चोरून आणल्या त्यांच्यावर अकोला जिल्हय़ाचे नंबर टाकले आहेत व ज्या दुचाकी अकोला जिल्हय़ातून चोरल्या त्यांना वाशिम व बुलडाणा जिल्हय़ाचे नंबर टाकले आहेत.

घरातून केल्या दहा दुचाकी जप्त
गाड्यांच्या मूळ मालकाचा शोध घेणे सुरू आहे. आरोपींकडून आणखी बर्‍याच गाड्या हस्तगत होण्याची शक्यता आहे. याअगोदर कुठून आणि कधी गाड्या चोरल्या आणि त्या कोठे विकल्या, याविषयीची माहिती आरोपींकडून घेतली जात आहे.’’ विलास पाटील, ठाणेदार, रामदासपेठ ठाणे