आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mp Dhotre And Mla Sharma Responsible For Undevelopment Of City Says Dhairyawan Pundkar

खासदार धोत्रे, आमदार शर्मांमुळे विकास थांबला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- ‘शहराचा विकास थांबण्यामागे भाजप खासदार संजय धोत्रे व आमदार गोवर्धन शर्मा आहेत’, असा आरोप भारिप-बमसंचे महापालिका समन्वयक प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला. 26 कोटी रुपयांच्या कामांबाबत विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड हे जातीयवाद करत आहे, असा आरोप त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी केला. महापौर, उपमहापौर व भारिप बमसंच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली तेव्हा हे आरोप केले. आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात शहर विकासासाठी राज्य शासनाने पाठवलेल्या 20 कोटींचा विशेष विकास निधी, दोन कोटी रुपये घनकचरा व्यवस्थापन, चार कोटी रुपये शासन निधीच्या नियोजनाबाबत भारिप-बमसंचे नेते प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांच्या नेतृत्वात महापौर ज्योत्स्ना गवई, काँग्रेस उपमहापौर रफिक सिद्दीकी व इतर भारिप नगरसेवकांनी विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांची जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या समक्ष भेट घेतली. या वेळी विभागीय आयुक्तांनी पालकमंत्री जे सांगतील ते करणार आहे, असे म्हणताच संतप्त प्रा. पुंडकर यांनी खासदार संजय धोत्रे व आमदार गोवर्धन शर्मा यांच्या इशार्‍यावर विभागीय आयुक्त कामकाज करत आहे, असा आरोप केला. खासदार व आमदारांच्या इशार्‍यामुळेच विभागीय आयुक्तांनी 26 कोटींचा प्रस्ताव मंजूर केला नाही, असा आरोप त्यांनी केला. हे सर्व जातीयवादाने प्रेरित आहे, असाही त्यांचा आरोप होता.

कायद्यापेक्षा मंत्री श्रेष्ठ : कायद्यापेक्षा मंत्री श्रेष्ठ असून, आपण पालकमंत्री सांगतील त्यानुसार 26 कोटींचा निधी खर्च करू, असे मत या वेळी विभागीय आयुक्तांनी व्यक्त केले. या वाक्यावर भारिप नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी कायदा श्रेष्ठ असल्याचे स्पष्ट केले.


अधिकार्‍यांना ठोकतो : शहर विकासाच्या आड जातीयवाद करणार्‍या अधिकार्‍यांना भारिप-बमसंच्या स्टाइलने धडा शिकवण्यात येईल, असा इशारा या वेळी भारिपच्या नेत्यांनी दिला. विकासकामांमध्ये अधिकार्‍यांनी आडकाठी आणल्यास त्यांना ठोकण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.


आरोप बिनबुडाचे
शहरातील जनतेचा भाजपवर विश्वास आहे. त्यामुळेच गेल्या चार टर्म मी आमदार म्हणून निवडून आलो. आरोप करणार्‍या व्यक्तींनी केवळ आरोप करू नये. नियमानुसार शहराचा विकास करावा. भाजप नगरसेवकांचे प्रभाग हे अकोल्याच्या बाहेर आहेत का, त्यांच्या प्रभागातील नागरिकांना त्रास व्हावा, असे आरोप करणार्‍यांचे मत आहे का?’’ गोवर्धन शर्मा, आमदार, अकोला (पश्चिम)

मागणी नियमबाह्य
विभागीय आयुक्त या कामांसाठी महासभेचा प्रस्ताव मागत असून, ते चुकीचे व नियमबाह्य आहे. शासनाने पाठवलेल्या विशेष 20 कोटींच्या शासन निधीसाठी मॅचिंग फंड टाकण्याची गरज नाही. विभागीय आयुक्त अध्यक्ष, जिल्हाधिकारी या समितीचे सदस्य सचिव आहे, तर महापालिका आयुक्त, शहर अभियंता हे सदस्य आहे. असे असताना शहरातील विकासकामे का थांबली.’’ प्रा. धैर्यवर्धन फुंडकर, समन्वयक, भारिप-बमसं

आरोप निराधार
वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी त्यांची अपेक्षा होती. पण, महासभेच्या मंजुरीनंतर तसे शक्य असल्याचे भारिपच्या शिष्टमंडळाला स्पष्ट करण्यात आले. खासदार आणि आमदार यांच्यासोबत संबंध जोडण्याचे करण्यात आलेले आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत.’’ डी. आर. बनसोड, विभागीय आयुक्त, अमरावती विभाग.

अधिकारी खासदारांच्या अधिपत्याखाली
खासदार संजय धोत्रे यांनी शिवसेनेच्या माजी आमदारांच्या बैठकीबद्दल काय मत आहे. विभागीय आयुक्त तोंडी आदेश देत काम करत आहेत. त्यांचे काम नियमानुसार नाही. खासदारांच्या यांच्या अधिपत्याखाली विभागीय आयुक्त आणि अधिकारी काम करत आहेत. मी कुठल्याही अधिकार्‍यांची बैठक घेतली नाही. सरकारी अधिकार्‍यांची भूमिका नकारात्मक आहे.’’ अँड. प्रकाश आंबेडकर, माजी खासदार

अधिकारांचा असंवैधानिक वापर
माजी खासदार अँड. आंबेडकर महापालिकेत कुठल्या अधिकारात अधिकार्‍यांच्या बैठका घेतात. ते सरकारी अधिकार्‍यांना कुठल्या अधिकारात आदेश देतात, त्यांचा अधिकारांचा वापर असंवैधानिक आहे. माझा खासदार म्हणून कुठल्याही प्रशासनात हस्तक्षेप नाही. नियमबाह्यपणे शासनाचा निधी खर्च होऊ नये, यासाठी प्रयत्न आहे. भारिप नेत्यांनी आरोप सिद्ध करावे.’’ संजय धोत्रे, खासदार, अकोला.