आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीच्या चालक-वाहकांकडूनच नियमांची केली जातेय ऐशीतैशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - हात दाखवा गाडी थांबवा, प्रवासी उचला उत्पन्न वाढवा, असे राज्य परिवहन महामंडळाचे धोरण आहे. या धोरणाकडे कानाडोळा करण्यासोबतच महामंडळाने प्रवाशांच्या हिताकरिता चालक वाहकांना घालून दिलेल्या साधारण नियमांचीसुद्धा त्यांच्याकडून पायमल्ली होते. याचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो.

महामंडळाला तोटा सहन करावा लागत असल्यामुळे महामंडळाच्या खासगीकरणाचा मुद्दा वारंवार ऐरणीवर येतो. मात्र, गेल्या काही वर्षांत महामंडळाने प्रवासी हिताचे धोरण अवलंबल्याने होणारा तोटाही भरून निघू लागला आहे. शिवाय एसटीच्या उत्पन्नातही भर पडू लागली आहे. एकीकडे महामंडळातील नोकरीसाठी हजारो बेरोजगार धडपडत असतात. तर, दुसरीकडे मात्र महामंडळाचा कणा समजला जाणारे चालक-वाहकच प्रवाशांच्या हितासोबतच महामंडळाच्या धोरणाला तिलांजली देत आहेत. उत्पन्नवाढीसाठी महामंडळाने हात दाखवा गाडी थांबवा, अशी भूमिका घेतली. मात्र, बसस्थानकाऐवजी इतरत्र उभे असताना अथवा एखाद्या थांब्यावर उभे असतानाही त्यांना बसमध्ये चढू दिले जात नाही. अशा प्रवाशांना नंतरच्या बसचा किंवा बस उशिराने असल्यास खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे महामंडळाचे उत्पन्न बुडते प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण होते.

बसगाड्यांना फलक लावण्याचा नियम असताना त्याचे उल्लंघन केले जाते. बर्‍याच वेळा बसेसना फलक लावण्यात आलेले नसतात. बस निश्चित केलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांकांवर लावण्यात येत नाही. त्यामुळे प्रवासी बसस्थानकावर असतानाही गाडी निघून जाते. एसटीचा प्रवास विलंबाचा कंटाळवाणा असल्याची त्यांची धारणा या प्रकारामुळे होते. अनेक चालक- वाहकांकडे कर्तव्यावर असताना गणवेश आणि परवाना नसतो. प्रवाशांकडून प्रवास भाड्याचा एक रुपयाही वाहक सोडत नाही, मात्र प्रवाशांचे अनेक रुपये वाहकांकडे बाकीच राहिलेले असतात. चिल्लरच्या कारणावरून ते प्रवाशाला परतही केले जात नाहीत. मात्र, तरीदेखील वाहकांकडून महामंडळाच्या बँकेत भरणा होत असलेली रक्कम कमी-जास्त असते. यासह महामंडळाने घालून दिलेले अन्य साधारण नियमही चालक- वाहकांकडून पाळले जात नाहीत. विशेष म्हणजे वाहकाच्या डोळ्यांसमोर बसच्या खिडकीतून साहित्य टाकून सीटवर ताबा सांगितला जातो. यावरून बसमध्ये आधी शिरलेला प्रवासी नियमबाह्यपणे जागा आरक्षित केलेल्या प्रवाशांमध्ये वारंवार वाद होतात. मात्र, वाहकाकडून यावर एक अवाक्षरही बोलले जात नाही. महामंडळाने बसमध्ये आरक्षित ठेवलेल्या जागेवरूनही तंटे होतात. एखादा प्रवासी अस्तित्वात नसलेले नियम जोरजोरात सांगतो, त्याकडेही लक्ष दिले जात नाही. या साधारण नियमांची महामंडळाचे कर्मचारीच ऐशीतैशी करत आहेत. मग वाहकाने प्रवाशाला सामान बसच्या वर चढवण्यास मदत करणे यासारखे नियम तर कालबाह्यच झाल्याचे चित्र आहे.

पाचशे चालक-वाहकांविरुद्ध कारवाई
महामंडळानेघालून दिलेल्या नियमांचे पालन करणार्‍या ४० चालक-वाहकांविरुद्ध एप्रिल महिन्यात कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. वर्षभरात जवळजवळ ५०० चालक-वाहकांनी नियमांचा भंग केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

चौकशीची प्रक्रिया संथ, दंड आकारणीही कमी
नियमांचेपालन करणार्‍या चालक-वाहकांवर महामंडळाकडून कारवाई हाेते. विभागीय कार्यालयातील अपराध शाखेमार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाते. ही चौकशीची प्रक्रिया संथपणे पार पडते. चौकशीअंती सादर अहवालावरून किमान ५० रुपये दंडाची शिक्षा सुनावली जाते.

एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांप्रमाणे खासगी प्रवासी वाहतुकीचे नियम निकष घालून देण्यात आलेले आहेत. मात्र, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहतुकीच्या नियमांना तिलांजली दिली जात आहे. महामंडळाच्या कर्मचार्‍यांना वरिष्ठ अधिकार्‍यांचे दडपण कारवाईची भीती असते. खासगी प्रवासी वाहतुकीकडे लक्षच नसल्याने ते स्वैरपणे वाटेल तसा प्रवास करत असल्याचे चित्र आहे. यामुळेच अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.

कर्मचार्‍यांनी नियमांचे पूर्णपणे पालन करावे
नियमांप्रमाणे कामकाज सुरू असते. नियमांचा भंग करणार्‍यांविरुद्ध महामंडळाच्या निकषांप्रमाणेच कारवाई केली जाते. कार्यरत सर्व कर्मचार्‍यांनी नियमांचे पूर्णपणे पालन करावे आणि त्यामुळे होणारी संभावित कारवाई टाळावी.'' एस.ए. भिवटे, विभागीय वाहतूक अधिकारी