आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील रस्ते उखडले; खाचखळग्यातून वाटचाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- दोन-तीनवर्षांपासून अकोल्यातील रस्त्यांची झालेली चाळणी शहरवासीयांसाठी कायम डोकेदुखी होऊन बसली आहे. मनपा यंत्रणेकडून कारणे सांगून वेळ मारून नेली जाते, मात्र रस्त्यांची साधी डागडुजीही होत नाही. मनपाकडे निधी नसल्यामुळे रस्त्यांची कामे वेळीच झाली नाहीत, असे सांगितले जाते, परंतु डागडुजीला तर खूप पैसा लागत नाही. तीही झालेली नाही. लोकप्रतिनिधी ढिम्म तर जनता सोशीक झाल्याने येरे माझ्या मागल्या, असे सुरू आहे. रस्ता दुरुस्तीचे काहीही तंत्र अकोल्यात सध्या तरी दिसत नाही.
रस्त्यांसाठी कधी निधीची कमतरता, लोकसभा, विधानसभा निवडणुकीची लागलेली आचारसंहिता यामुळे कामे होऊ शकली नाहीत, असे सांगितले जाते. परंतु, शहरातील रस्ते काही आताच खराब झालेले नाहीत. याकडे गेली काही वर्षे लक्षच दिल्या गेले नसल्यामुळे लहानशी जखम आता नासूर हाेऊन बसली आहे. शहराच्या कोणत्याही भागात जा, रस्ते चांगले नाहीत. जे काही ठीकठाक आहेत, त्यांचीही धूळधाण होत आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर हेत्वारोप करत असतात, परंतु मूळ विषय बाजूलाच राहतो. रस्त्यांची कामे होत नाहीत म्हणून काही सामाजिक संघटनांनी आंदोलने केली. राजकारण्यांना जाग यावी, लोकांना दिलासा मिळावा, हा त्यांचा प्रयत्नही लोकप्रतिनिधींनी यशस्वी होऊ दिला नाही. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे रस्त्यांची चाळण झाली. अकोला शहरात रात्रीतून रस्ते तयार होतात. हॉटमिक्सद्वारे केलेले रस्ते टिकत नाहीत. त्या कामावर पाणी पडले तरी रस्ते उखडतात. शहरात धडाक्यात सुरू झालेली ही कामे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी बंद पाडली होती. कंत्राटदारांना काम करणे मुश्कील झाले होते. त्यामुळे मनपाचे मात्र साधले. आम्ही कामे करायला तयार आहोत, परंतु लोकप्रतिनिधीच आडकाठी आणत आहेत, हे म्हणायला ते मोकळे झाले. शहरातील महत्त्वाचे रस्ते उखडले आहेत. त्यातून वाहने चालवणे तर दूर, पायी चालणेही अवघड झाले आहे. खाचखळग्यातून शहरवासीयांची वाटचाल सुरू आहे. सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनसमोर, कस्तुरबा गांधी रुग्णालयासमोर, जिल्हा स्त्री रुग्णालयासमोरून जाणे कठीण आहे. या रस्त्यावर पाणी साचलेले असल्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा कायम सामना करावा लागतो तसेच दुर्गा चौकात रुहाटिया यांच्या निवासस्थानासमोर आहे. येथूनही वाटचाल करणे त्रासदायक आहे.
शहरातील खड्डे जसे डोकेदुखी ठरणारे आहेत तसेच सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर तयार करण्यात आलेल्या गतिरोधकांचे आहे. कुठलेही तारतम्य ठेवता अकोल्यात विकासकामे होतात, परंतु त्यांचा लोकांना त्रास होतो. अकोल्यातील विकासाचे स्वतंत्र मॉडेलच येथील मनपा यंत्रणेने तयार केले आहे. भारिप-बमसंची सत्ता असताना सत्ताधाऱ्यांना कोणती कामे प्राधान्याने घ्यावी, याचा अदमास आल्याने त्यांच्या कार्यकाळात काहीही कामे झाली नाहीत. त्याच वेळी रस्ते विकासासाठी 15 कोटी रुपये मनपाकडे आले होते. मात्र, ती कामे झाली नाहीत. आता सत्तांतर झाले आहे. महापालिकेत भाजप-सेना युतीची सत्ता आली आहे. त्यांच्या कार्यकाळात तरी जनतेला दिलासा मिळावा, अशी अपेक्षा आहे. प्राप्त माहितीनुसार, १२ रस्त्यांची १५ कोटींची कामे तातडीने मार्गी लागणार आहेत. या कामांची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली असून, दोन आठवड्यांत कामे सुरू होतील, असे मनपा अधिकारी सांगत आहेत. दीर्घ रजेवर जाण्यापूर्वी मनपा आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनीही पत्रकार परिषदेत रस्त्यांच्या कामांविषयी सांगितले होते. त्याचा प्रत्यय आला पाहिजे. लोक आता अधीर झाले आहेत. वाट पाहण्याची वेळ संपली असून, लोकांचे लक्ष आता विकासाकडे लागले आहे.