आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्शिटाकळीच्या धर्तीवर राबवा मोहीम, नगरसेवक अजय शर्मांचे प्रशासनाला आ‌वाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- प्रशासनाने बार्शिटाकळी येथील मुख्य जलवाहिनीवरील अवैध नळजोडण्यांवर केलेली कारवाई ऐतिहासिक ठरली आहे. याच धर्तीवर प्रशासनाने शहरातील प्रत्येक प्रभागात मोहीम राबवून असेसमेंट तसेच अवैध नळजोडण्या अधिकृत करून महापालिकेचे उत्पन्न वाढवावे, असे आवाहन नगरसेवक अजय शर्मा यांनी केले आहे.
बार्शिटाकळी येथे मुख्य जलवाहिनीवर अनेक वर्षांपासून सर्रासपणे अवैध नळजोडण्या होत्या. हा प्रकार आतापर्यंत आलेल्या सर्वच अधिकाऱ्यांना माहिती होता. परंतु, कारवाई कोणीही केली नाही. ही कारवाई उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी करून दाखवली. ७५ कर्मचाऱ्यांची फौज घेऊन ही कारवाई केल्याने अवैध नळजोडण्यांचा सफाया झाला आणि शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली. ज्याप्रमाणे मुख्य जलवाहिनीवर अवैध नळजोडण्या आहेत, त्याच धर्तीवर शहरातही अवैध नळजोडण्या आहेत. तसेच अनेक मालमत्तांची नोंद झालेली नाही. मालमत्तांची नोंद झाल्यामुळे महापालिकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
शहरात विकासकामे करण्यासाठी उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे. उत्पन्न वाढल्यासच शहराचा विकास होईल. त्यामुळे प्रशासनाने बार्शिटाकळीच्या धर्तीवर तेवढाच कर्मचारी वर्ग सोबत घेऊन प्रत्येक प्रभागात ही मोहीम राबवावी. एका प्रभागात पाच दिवस मोहीम राबवल्यास अवैध नळजोडण्या वैध होतील तसेच ज्या मालमत्तांची नोंद झालेली नसेल त्या मालमत्तांची नोंद होईल. अशा पद्धतीने प्रत्येक प्रभागात मोहीम राबवल्यास नोंद झालेल्या मालमत्तांच्या नोंदी सहज होतील आणि महापालिकेला उत्पन्न मिळेल. प्रशासनाने उत्पन्न वाढवण्याच्या हेतूने ही मोहीम त्वरित राबवावी, असे आवाहन अजय शर्मा यांनी केले आहे.
केवळ एक वर्षाचा कर आकारावा
अवैधनळजोडण्या वैध करताना तीन वर्षांचा कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मालमत्ताची नोंदणी करतानाही एका वर्षापेक्षा जास्त वर्षाचा कर घेतला जातो. या निर्णयामुळेच सर्वसामान्य नागरिक असेसमेंट करण्यास पुढे येत नाही. त्यामुळे अवैध नळ असो किंवा मालमत्ता, यांची नोंद करताना त्यांच्याकडून एक वर्षाचा कर आकारल्यास सर्वसामान्य नागरिक त्यास भरभरून प्रतिसाद देतील आणि महापालिकेला त्याचा फायदाही होईल, अशी मागणीही नगरसेवक अजय शर्मा यांनी केली आहे.