आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Administration,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जठारपेठ, दुर्गा चौकातील अतिक्रमण पुन्हा हटवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिका प्रशासनासाठी डोकेदुखी ठरलेल्या जठारपेठ चौकातील भाजी विक्रेते तसेच दुर्गा चौक, लेडी हार्डिंग्ज परिसरातील लघू व्यावसायिकांवर गुरुवारी, 19 जून रोजी आयुक्त, उपायुक्तांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.
जठारपेठ चौकात रस्त्याच्या दुतर्फा अनेक भाजी विक्रेते चारचाकी गाडी लावतात. यामुळे रहदारीत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या चौकातील वाहतूक जाम होते. या भाजी विक्रेत्यांना चौकालगत बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलात ओटे बांधून देण्यात आले होते. या ओट्यांची हर्रासी झाली होती. परंतु, भाजी विक्रेत्यांनी काही दिवसच या ओट्यांचा वापर केला. त्यानंतर पुन्हा भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने चौकात थाटली. या भाजी विक्रेत्यांना हटवण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केल्यानंतर भाजी विक्रेत्यांवर आतापर्यंत पाच ते सात वर्षांत शेकडो वेळा कारवाई करण्यात आली. परंतु, या कारवाईचा काहीही फायदा अथवा उपयोग झाला नाही. त्यामुळे जठारपेठ चौकातील भाजी विक्रेते प्रशासनासाठी डोकेदुखी ठरले आहेत.
अतिक्रमण हटाव पथकाने 18 जूनला अकोटफैल भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबवल्यानंतर 19 जूनला जठारपेठ चौक, दुर्गा चौक, लेडी हार्डिंग या भागात भाजी विक्रेते, मटण विक्रेते, चहाच्या टपर्‍या, पानठेले, दुकानदारांनी दुकानासमोर लावलेले टिनशेड आदी जेसीबी मशीनच्या साहाय्याने काढण्यात आले, तर जठारपेठ चौकात अतिक्रमण विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी दिवसभर ठाण मांडून भाजी विक्रेत्यांना गाड्या लावण्यास मज्जाव केला. ही कारवाई आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटाव पथकाचे अधिकारी विष्णू डोंगरे, प्रवीण मिर्शा, विजय बडोणे, संजय थोरात, विनोद वानखडे, रुपेश इंगळे, नवीन रणपिसे, मधुकर कांबळे यांनी केली.
भाजी विक्रेत्यांना हुसकावून लावले
भाजी विक्रेत्यांवार आतापर्यंत शेकडो वेळा कारवाई करण्यात आली. मात्र, प्रत्येक कारवाईत भाजी विक्रेत्यांना केवळ हुसकावून लावण्यात आले. परंतु, 19 जूनच्या कारवाईत अतिक्रमण हटाव पथकाने भाजी विक्रेत्यांच्या गाड्या उलटून दिल्या. त्यामुळे भाज्या रस्त्यावर पडल्या होत्या. या प्रकारची कारवाई प्रथमच करण्यात आली.
लास्ट वॉर्निंग
भाजी विक्रेत्यांनी यापुढे जठारपेठ चौकात भाजी विक्रीच्या चारचाकी गाड्या लावू नयेत, असा अंतिम इशारा प्रशासनाने दिला. स्वा. सावरकर सभागृहाच्या सर्व्हिस गल्लीत दिव्यांची व्यवस्था केली आहे. भाजी विक्रेत्यांनी या ठिकाणी गाड्या उभ्या कराव्यात अन्यथा भाजी विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल, अशी लास्ट वॉर्निंग प्रशासनाने भाजी विक्रेत्यांना दिली आहे.
कारवाईनंतरही अतिक्रमण
जठारपेठ, दुर्गा चौक, लेडी हार्डिंग्ज परिसरातील अतिक्रमण करणार्‍यांवर आतापर्यंत अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईनंतर काही दिवसांनी पुन्हा अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे या कारवाईचा काहीही फायदा होत नाही.
नंतर काय?
भाजी विक्रेत्यांना लॉस्ट वॉर्निंग देण्यात आली. परंतु, या वॉर्निंगनंतरही भाजी विक्रेत्यांनी जठारपेठ चौकात गाड्या लावल्यास त्यांच्या विरुद्ध नेमकी कोणती कारवाई केली जाणार? याबाबत अतिक्रमण हटाव पथकातील अधिकार्‍यांनाही निश्चित माहिती नाही.