आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 बड्या हॉस्पिटल्सचीही बांधकामे अनधिकृत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिका क्षेत्रात 184 संकुलांचे बांधकाम अनधिकृत ठरवण्यात आले आहे. या प्रकरणाचा अद्याप निकाल लागलेला नसताना आता शहरातील २४ खासगी हॉस्पिटल महापालिकेच्या रडारने टिपली असून, या हॉस्पिटलला अनधिकृत बांधकामप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. ३० दिवसात अनधिकृत बांधकाम स्वखर्चाने निष्कासित करा अन्यथा पुढील कारवाई केली जाईल, असा इशाराही मनपा नगररचना विभागाने संबंधित हॉस्पिटलला दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अनधिकृत बांधकामाला आळा घालण्यासाठी निर्माणाधीन बांधकामे मोजून काढली. १८४ निर्माणाधीन बांधकामे अवैध ठरल्याने ही सर्व बांधकामे थांबली आहेत. आयुक्तांच्या या कारवाईमुळे बिल्डर्स लॉबीत एकच खळबळ उडाली होती. तर बांधकामाचा नकाशा मंजूर करताना नियमानुसार लागणारी सर्व कागदपत्रे दाखल केल्याशिवाय नकाशा मंजूर केला जाणार नाही, अशी सक्ती केल्याने अनेक निर्माणाधीन बांधकामाच्या फाइल्स तूर्तास पाइपलाइनमध्येच आहे. १८४ अनधिकृत बांधकामांबाबत प्रशासनाने कंपाउंडिंग फी लावण्याचा प्रस्ताव महासभेकडे पाठवला होता. परंतु, तत्कालीन सत्ताधारी गटाने हा विषय पेंडिंग ठेवला. त्यामुळे या अवैध बांधकामांवर पाडण्याची तसेच दंडात्मक कारवाई झाली नाही. तूर्तास महापालिकेत सत्ताबदल झाला असला तरी अद्याप हा विषय महासभेत घेण्याबाबत सत्ताधारी गटात एकमत झालेले नाही.

एकीकडे या प्रकारामुळे खळबळ उडाली असताना आता महापालिकेच्या नगररचना विभागाच्या रडारने शहरातील ३० नामांकित सदैव रुग्णांनी गजबजलेले हॉस्पिटल टिपले आहेत. या ३० पैकी २४ हॉस्पिटलला अनधिकृत बांधकामप्रकरणी महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम २६० महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे ५२, ५३, ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसाच्या आत अनधिकृत बांधकाम स्वखर्चाने निष्कासित करावे अन्यथा पुढील कारवाई करण्याचा इशाराही नगररचना विभागाने दिला आहे.