आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Commissioner Somnath Shettye News In Marathi

सामाजिक संघटनांचे घेणार सहकार्य, शहराला प्लास्टिक प्रदूषणमुक्त करू; आयुक्तांची ग्वाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहराला प्लास्टिक प्रदूषणमुक्त करतानाच साफसफाईकडे विशेष लक्ष देऊ, अशी ग्वाही आयुक्त सोमनाथ शेट्ये यांनी दिली. ११ फेब्रुवारीला आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी औपचारिकरीत्या बोलत होते.
रुजू होण्यापूर्वी अकोला महापालिकेची काही माहिती जाणून घेतली आहे. इथे अनेक समस्या आहेत. त्या समस्या सोडवायच्या आहेत. सर्वांच्या समन्वयातून या समस्या निकाली काढणे सहज शक्य आहे. परंतु, प्रथम साफसफाईसह प्लास्टिक प्रदूषणमुक्तीकडे लक्ष केंद्रित करून शहराला प्लास्टिक प्रदूषणमुक्त करण्याचा माझा प्रयत्न राहील. रोटरी, लायन्स, रेडक्रॉस यांसारख्या संस्थांसह विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून ही बाब शक्य आहे. स्वयंसेवी संस्थांचीही याासाठी मदत घेतली जाईल. ही मोहीम वर्धा शहरात यशस्वीरीत्या राबवली. इथेही ही मोहीम राबवली जाईल. तसेच सहकारातून स्वच्छता मोहीम राबवून शहराला स्वच्छ करण्याचा आपला मानस आहे, यासाठी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे, असेही आयुक्त सोमनाथ शेट्ये म्हणाले.
यापूर्वी औरंगाबाद महापालिकेत उपायुक्त म्हणून काम केले असल्याने महापालिकेच्या कामकाजाच्या पद्धतीचा अनुभव आहे. मला महापालिका नवीन नाही. त्यामुळेच उत्पन्न वाढवण्याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. उत्पन्न वाढवल्याशिवाय विकासकामे अथवा कर्मचाऱ्यांचे वेतन देणे शक्य नाही. त्यामुळे मालमत्ता कराच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने प्रयत्न केला जाईल. दुर्दैवाने गत अनेक वर्षांपासून रिअसेसमेन्ट झालेली नाही. त्यामुळे प्रथम रिअसेसमेन्ट करण्यास मी प्राधान्य देईल. त्याच बरोबर उत्पन्न वाढवण्याच्या इतर स्रोतांकडेही लक्ष दिले जाईल. महापालिका अस्तित्वात येऊन १५ वर्षे होत आली अाहेत. मात्र, अद्यापही मालमत्तांची नोंद केवळ ७० हजार आहे, तर नळजोडण्यांची संख्याही तुलनेने कमी आहे. त्यामुळे मालमत्ता करातून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्याचा आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही नवनियुक्त आयुक्त सोमनाथ शेट्ये यांनी दिली.
अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून स्वागत : आयुक्तांनीपदभार स्वीकारल्यानंतर मनपातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर आयुक्तांनी रुजू झाल्यानंतर महापौर उज्ज्वला देशमुख, उपमहापौर मापारी यांचीही सदिच्छा भेट घेतली.

दबावाखाली काम करणार नाही
उत्पन्नवाढवण्यासाठी विविध उपाययोजना आखाव्या लागतील. काही उपाययोजना आखलेल्या आहेत. याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्याशिवाय उत्पन्नात वाढ होणार नाही. त्यामुळेच कोणत्याही दबावाखाली मी काम करणार नाही. तसेच दबावही सहन करणार नाही. माझी सहकार्याची भूमिका राहील, त्यामुळे इतरांनीही मला सहकार्य करावे, असेही आयुक्त सोमनाथ शेट्ये यांनी स्पष्ट केले.