आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नपा प्राथमिक शाळांची अवस्था झाली दयनीय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वणी - वणीयेथील नगरपालिकेच्या शाळांची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. परिणामी, शाळा क्रमांक दोनमध्ये बांधण्यात आलेल्या वर्गखोल्यांना शौचालयाचे स्वरूप प्राप्त झाले तर इतर शाळांमधील चिमुकल्यांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. जुन्या इमारती मोडकळीस आल्याने धोक्याची शक्यताही आहे. पालिका प्रशासन मात्र या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार नगरसेवक अभिजित सातोकर सिद्दीक रंगरेज यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

वणी शहरामध्ये नगरपालिकेच्या ११ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी, मुतारी, संडास, वर्गखोल्यांवरील छप्पर आदी सुविधाच उपलब्ध नाहीत. ज्या शाळांमध्ये ह्या सुविधा आहेत, त्या शाळांची इमारत अत्यंत जीर्ण झालेली आहे. नगरसेवक अभिजित सातोकर सिद्दीक रंगरेज यांनी शाळांची प्रत्यक्ष पाहणी केली असता, शाळा क्रमांक चारमधील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये किडे, नारू आणि गांडूळ आढळून आलेले आहेत. शाळा क्रमांक तीनमध्ये विद्यार्थ्यांकरिता भारतीय स्टेट बँकेने दिलेले जलशुद्धीकरण यंत्र धूळ खात पडले आहे. तर, वर्गखोल्यांचे छत मोडकळीस आलेले आहे. परिणामी, शाळा क्रमांक तीनमधील वर्गखोल्यांची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असल्याची शक्यताही नगरसेवकांनी तक्रारीतून वर्तवली आहे. शाळा क्रमांक नऊमध्ये पालिकेने कोणतीही सुविधा पुरवलेली नाही, ना पाण्याची सोय, ना धड बसायची सोय अशी दयनीय अवस्था या शाळेची झाली आहे. शाळा क्रमांक सहाला नवीन इमारत आहे. मात्र, या इमारतीचा वापरच होत नाही. तसेच मुलांच्या बसण्याच्या जागेवर स्वयंपाकासाठी आणलेली जळावू लाकडे ठेवण्यात आली आहे. उर्दू शाळेसभोवताल घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे आणि शाळाच पूर्णत: अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेली आहे. या शाळेची इमारतसुद्धा नादुरुस्त आहे. परिणामी, चिमुकल्यांच्या जीवाला धोका होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवत नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवाचा विचार करणे आवश्यक आहे. ते तसे करत नसतील तर जिल्हाधिकारी यांनी याबाबत त्यांना निर्देश देण्याची मागणी होत आहे.
तसे पाहिजे तर जिल्हाभरातीलच नगरपालिकेच्या शाळांची अवस्था सध्या वाईट झाली आहे. शैक्षणिक गुणवत्ता सातत्याने घसरत असल्याने पालकवर्ग आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळवून देत आहे. लागेल तेवढा खर्चाची त्याची तयारी आहे.

उर्दू शाळेसाठी निविदा प्रक्रियाच नाही
उर्दूशाळेला अल्पसंख्याक निधी आलेला असताना नगरपालिकेेने अद्याप निविदा प्रक्रिया केलीच नसल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. तर, शाळा क्रमांक दोनमध्ये सर्व शिक्षा अभियानातून बांधण्यात आलेल्या वर्गखोल्यांचा वापर शौचालयासाठी होत आहे. एकूणच पालिका पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळेच वणी शहरातील शाळांची दयनीय अवस्था झाल्याची तक्रार नगरसेवक अभिजित सातोकर सिद्दीक रंगरेज यांनी करीत चौकशीची मागणी केली आहे.

शहरात इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू करावी
नगरपालिकेतीलशाळांमध्ये मराठी उर्दू माध्यम शिकवण्यात येते, परंतु इतर खासगी शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू आहे. परिणामी, पालकांचा कल खासगी शाळांकडे वळला असल्याने पालिकेने सेमी इंग्रजी माध्यमचे वर्ग सुरू करण्याची मागणीसुद्धा नगरसेवकांनी केली आहे.

दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची गरज
पालिकेतीलशाळांमधील पहिल्या वर्गात अत्यंत कमी पटसंख्या आहे. पालिकेचे उदासीन धोरण विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ पालिकेतील अधिकारी पदाधिकारी करीत आहे. तरी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक अभिजित सातोकर सिद्दीक रंगरेज यांनी केली आहे.