आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्त आले आणि गेले; दिवाळी ‘हँगओव्हर’ संपेना!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अनेक दिवसांपासून महापालिकेला दिवाळीची सुटी लागली आहे. तिची प्रचिती गुरुवारीही आली. शाळेची दिवाळी सुटी संपत चालली आहे. मात्र, महापालिकेतील सुटी कायम असल्याचे चित्र आहे. महापालिकेत अधिकार्‍यांची उपस्थिती कमी असून, ते अन्यत्रच काम करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे. महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांनी महापालिकेत उपस्थित राहून काही वेळ महत्त्वाच्या फाईल्स मार्गी लावल्या.

प्रभारी आयुक्त डॉ. गुटे महापालिकेत आल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांना कर्मचार्‍यांनी गाठत गार्‍हाणी मांडली. त्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर कंत्राटदारांनी त्यांची व्यथा मांडली. झालेल्या कामांचे देयक देण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर प्रभारी आयुक्तांनी महापालिका सोडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पत्रकारांनी त्यांना गाठले. शहरात साफसफाई सुरू असून, कचरा उचलणार्‍या कंत्राटदाराला दंड ठोठावत असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्ताचा प्रभार स्वीकारल्यापासून आपण दिवाळीनंतरच थेट येत असल्याचे पत्रकारांनी त्यांना विचारताच त्यांनी आपण महापालिका हद्दीतच बसत असल्याचे कारण पुढे करत वेळ मारून नेली.

दरम्यान, महापालिकेतील इतरही अनेक अधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. प्रभारी आयुक्तांनी महापालिकेची अचानक पाहणी करत गैरहजर कर्मचार्‍यांची माहिती गोळा करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मागील आठवड्यात प्रभारी आयुक्तांनी महापालिकेकडे पाठ फिरवली होती. या आठवड्यात गुरुवारी त्यांनी महापालिका गाठत काही कामे केली. मात्र, इतर वेळा ते महापालिकेबाहेर हुतात्मा स्मारक, एलबीटी ऑफिस व इतर ठिकाणी कामकाज करत मुख्य कार्यालयापासून दूर राहत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

अधिकार्‍यांची गैरहजेरी ही चुकीची बाब
महापालिकेत काही अधिकार्‍यांची गैरहजेरी ही चुकीची आहे. याबाबत आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करत दोषी अधिकार्‍यांवर कडक कारवाई केली पाहिजे. नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही, यासाठी प्रभारी आयुक्तांनी काळजी घेण्याची गरज आहे.’’ ज्योत्स्ना गवई, महापौर, महापालिका