आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांना शह देण्याच्या प्रयत्नात महापौरांनाच काटशह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेत तूर्तास विकासाऐवजी शहकाटशहचे राजकारण सुरू आहे. पुन्हा एकदा पदाधिकारी विरुद्ध प्रशासन, असा सामना रंगतोय. कधी प्रशासनाचे पारडे जड, तर कधी पदाधिकार्‍यांचे. गत दोन ते तीन दिवसांपासून सामन्यात दररोज रंगत वाढतेय. १४ मे रोजी महापौरांनी आयुक्तांना शह देण्याच्या हेतूने सत्ताधारी गटातील नगरसेवकांची बैठक बोलावली होती. सकाळी ११ वाजता बोलावलेली ही बैठक प्रत्यक्षात दुपारी दोन वाजता सुरू झाली. बैठकीला केवळ ते १० नगरसेवक उपस्थित होते. यामुळे आयुक्तांना शह देण्याच्या नादात महापौरांनाच सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी काटशह दिल्याची चर्चा महापालिकेत दिवसभर सुरू होती.

तूर्तास महापालिकेतील वातावरण बिघडलेले आहे. एकीकडे कोट्यवधी रुपयांचा निधी आलेला असताना विकासकामे संथगतीने सुरू आहेत. या कामांना गती यावी, यासाठी कोणीही फॉलोअप घेताना दिसत नाही. याउलट कोणी किती कमिशन घेतले, याचाच शोध घेण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे या ना त्या कारणाने पदाधिकारी प्रशासनात खडाजंगी होत आहे. १३ मे रोजीही प्रशासन आणि पदाधिकार्‍यांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाली. अंदाजपत्रकाची सभा होऊन अनेक दिवसांचा कालावधी झाला आहे. मात्र, अंदाजपत्रकाच्या मंजुरीचा प्रस्ताव अद्याप प्रशासनाला मिळाल्याने कामे करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होत आहे. परंतु, या गंभीर विषयाला वगळून इतर कामेच मार्गी लावण्याचा प्रयत्न काही पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून सुरू आहे.

या अनुषंगानेच १४ मे रोजी महापौरांनी सत्ताधारी गटातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक बोलावली होती. सकाळी ११ वाजता बैठकीला हजर राहण्याचा निरोपही देण्यात आला. परंतु, ११ वाजता बोटावर मोजण्याइतके नगरसेवक उपस्थित झाले. महापौर स्वत: दुपारी १२ वाजता आल्या. यादरम्यान काही नगरसेवक निघून गेले. अखेर दोन वाजता आठ ते दहा नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक सुरू झाली. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीत प्रशासनाला शह कसा द्यायचा, यावर चर्चा झाली. यातून कोणताही ठोस निष्कर्ष निघाला नाही. उलट सत्ताधारी गटातील नगरसेवकांनीच बैठकीला ठेंगा दाखवून महापौरांनाच काटशह दिला, अशी चर्चा सुरू झाली.
बातम्या आणखी आहेत...