आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका नियमबाह्य पदोन्नतीची चौकशी करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महापालिकेत झालेल्या नियमबाह्य पदोन्नतीची चौकशी नवनियुक्त आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी करावी, अशी मागणी मनपा कर्मचारी करत आहे. 2012 मध्ये देण्यात आलेल्या पदोन्नतीमध्ये सेवा प्रवेश नियमांचे उल्लंघन झाले आहे. पदोन्नती समितीने केलेल्या शिफारशी या वेळी बासनात गुंडाळण्यात आल्या होत्या. या सर्व प्रकरणात तत्कालीन आयुक्त व मुख्य लेखापरीक्षक यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर कर्मचार्‍यांनी केली आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणात आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी वस्तुनिष्ठ अहवाल देण्याचा आदेश संबंधितांना दिल्याची माहिती मिळाली. 2008 मध्ये स्थापन झालेल्या पदोन्नती समितीने राज्य शासनाकडे सेवा प्रवेश नियम पाठवले होते. पण, शासनाने हे सेवा प्रवेश नियम मंजूर केले नाहीत. असे असतानाही महापालिका प्रशासनाने 165 लोकांची पदोन्नती करून याबाबतचे नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप अन्याय झालेल्या कर्मचार्‍यांनी केला आहे.

2008 मध्ये प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना डावलत इतरांची नियमबाह्य पदोन्नती करण्यात आली. 1980 पूर्वी रुजू झालेल्या कर्मचार्‍यांना पदोन्नती न देता थेट 2003 मध्ये लागलेल्या काही कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात आली. वर्ग चार प्रवर्गात कार्यरत कर्मचार्‍यांना अशी पदोन्नती देत थेट अधिकारी केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये चतुर्थ र्शेणी कर्मचारी, लिपिक, मुख्य लिपिक, लेखापाल, उपमुख्य लेखापाल, वाहनचालक आदींच्या पदोन्नत्या नियमबाह्यपणे झाल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेतील या पदोन्नती घोटाळ्याची चौकशी करावी व घोटाळा करणार्‍याची जबाबदारी निश्चित करत कारवाई करावी, अशी मागणी अन्यायग्रस्त कर्मचार्‍यांनी केली आहे.

पदोन्नती अनेक त्रुटी : पदस्थापना झालेल्या वाहनचालकाला पदोन्नती देय नसताना देण्यात आली. आंतरजिल्हा बदली झालेल्या एका कर्मचार्‍याची नवी सेवाज्येष्ठता ग्राह्य न धरता जुन्याच सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली. नियमबाह्य पदोन्नती झालेले कर्मचारी या ठिकाणी कार्यरत नसून, जुन्याच पदस्थापनेवर कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली.