आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation School Development Issue Akola

आता महापालिका शाळांच्या समायोजनात शिक्षकांचाच खोडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेचा आस्थापना खर्च कमी करतानाच एकाच प्रीमायसेसमध्ये एकच शाळा या नियोजनानुसार महापालिका प्रशासनाने केलेल्या शाळा समायोजनाला काही शिक्षकांनी विरोध केला आहे. यासाठी काही नगरसेवकांना हाताशी धरून आयुक्तांवरही दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शाळांच्या समायोजनावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिकेच्या मराठी, उर्दू, हिंदी माध्यमाच्या एकूण ५५ शाळा आहेत. यांपैकी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे. शासनाच्या नियमानुसार २० विद्यार्थी असल्यास शाळा बंद करता येत नाही, तर दुसरीकडे पटसंख्येनुसार शिक्षकांची संख्या निश्चित केली जाते. त्यामुळे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असताना विद्यार्थ्यांची संख्या मात्र, अनेक शाळांमध्ये ३० ते ३५ आहे. त्यामुळे चार वर्ग असताना शिक्षक मात्र, दोन किंवा तीन दिले जातात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होते. विशेष म्हणजे, एकाच परिसरात एकाच माध्यमाच्या विविध क्रमाकांच्या शाळा आहेत. यात उर्दू, हिंदी, मराठी या तिन्ही माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. अशा शाळांसह फारशा अंतरावर नसलेल्या तसेच एकाच प्रीमायसेसमधील कन्या मुलांच्या शाळांचे समायोजन करण्याच्या सूचना प्रशासनाने शिक्षण विभागाला दिल्या होत्या.

तत्कालीन उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी तहसीलदारांची मदत घेऊन कोणत्या शाळा कोणत्या शाळेत मर्ज करता येतील, याचा अभ्यास करून १२ जानेवारी २०१५ ला शाळांचे समायोजन निश्चित केले. या समायोजनाच्या प्रस्तावावर उपायुक्तांची स्वाक्षरी झाली होती. मात्र, तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांची स्वाक्षरी झाली नव्हती. तसेच शाळेचे सत्र संपल्यानंतर शाळांचे समायोजन केले जाणार होते. जेणेकरून २०१५-२०१६ चे शैक्षणिक सत्रात शाळा निश्चित होऊन शाळांचे प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळेच आता शाळा समायोजनाची फाइल पुन्हा बाहेर आली आहे. काही शिक्षकांचाही सहभाग असून, काही शिक्षकांनी काही नगरसेवकांना हाताशी धरून शाळा समायोजनात बदल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

- शाळा समायोजनास आमचा विरोध नाही. परंतु, ज्या शाळांमध्ये १०० पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत, त्या शाळांचे समायोजन करू नये. ज्या शाळांमध्ये कागदोपत्री पटसंख्या आहे, त्या शाळांचे समायोजन करण्यास आमचा विरोध नाही. परंतु, समायोजन नियमानुसार व्हावे.'' रवींद्रवानखडे, कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

- नियमानुसारच शाळांचे समायोजन करावे लागणार आहे. शाळांचे समायोजन करताना विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची खबरदारीघ्यावी. केवळ बदली होईल, यासाठी समायोजनास विरोध करू नये.'' डॉ.रणजित पाटील, पालकमंत्री

- शाळा समायोजनामुळे कोणत्याही शिक्षकाची नोकरी जाणार नाही.त्यामुळे शाळा समायोजनाचा शिक्षकांना कोणताही धोका नाही, तर दुसरीकडे महापालिकेचा आर्थिक भारही कमी होईल.'' सोमनाथशेट्ये, आयुक्त महापालिका

आतापर्यंत ४१ शाळा बंद
महापालिका२००१ ला अस्तित्वात आली. त्या वेळी महापालिका शाळांची संख्या ७३ होती. गेल्या तेरा वर्षांच्या काळात शाळा बंद पडल्याने ही संख्या ५६ त्यानंतर ५५, तर आता ३२ वर येईल. शिक्षकांच्या वेतनासाठी राज्य शासनाकडून ५० टक्के अनुदान दिले जाते, तर महापालिकेला ५० टक्के अनुदान टाकावे लागते.

सर्व काही बदली रोखण्यासाठी
महापालिकेत ३०१ शिक्षक कार्यरत आहेत. ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, असे शासनाचे धोरण आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या २०० पेक्षा अधिक झाली तर हा नियम लागू होता. ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असा नियम लागू होतो. शाळांचे समायोजन झाल्याने अनेक शाळांची संख्या २०० वर गेली आहे. त्यामुळे ४० विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक या रेशोनुसार ८२ शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांच्या बदल्या इतर गावांमध्ये होतील. या बदल्या होऊ नयेत, या एकमेव कारणामुळे शाळा समायोजनात खोडा आणण्याचा घाट घातला जात आहे.