आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा सफाई कर्मचार्‍यांचे आंदोलन अद्यापही सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महापालिका आयुक्तांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सफाई कर्मचारी वगळता इतर कर्मचार्‍यांनी आंदोलन मागे घेतले आहे. मात्र सफाई कर्मचार्‍यांच्या कामबंद आंदोलनाचा तिढा अद्यापही कायम आहे.

सात ऑक्टोबरपासून मनपा कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. शासकीय विर्शामगृहात प्रभारी आयुक्त डॉ. उत्कर्ष गुटे, महापौर ज्योत्स्ना गवई, उपमहापौर रफिक सिद्दीकी, विरोधी पक्षनेते हरीश अलिमचंदानी, व कर्मचारी संघटनांच्या नेत्यांमध्ये शुक्रवारी संप मागे घेण्यासंदर्भात चर्चा केली. 26 कोटींच्या विकास निधीतून कर्मचार्‍यांचे वेतन देणे तांत्रिकदृष्ट्या योग्य नसून, त्याची प्रक्रिया प्रदीर्घ आहे. त्यामुळे मनपाकडे उपलब्ध इतर निधीतून कर्मचार्‍यांचे वेतन देता येऊ शकते का? हे प्रशासकीयस्तरावर तपासण्याचा निर्णय घेतला. चार कोटींच्या निधीतून कर्मचार्‍यांचे वेतन देण्याचा निर्णय घेतला. या चर्चेत कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला. आयुक्तांनी मनपा कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी संघर्ष समितीचे अध्यक्ष पी. बी. भातकुले यांना पत्र देऊन मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्याने संप मागे घेण्याची विनंती केली. पात्र कर्मचार्‍यांच्या पाचव्या वेतन आयोगाच्या थकित रकमेपाटी प्रत्येकी 20 हजार रुपये 30 ऑक्टोबरपूर्वी अदा करण्यात येईल.

ज्या कर्मचार्‍यांची पाचव्या वेतन आयोगाची रक्कम 20 हजाराच्या आत असल्यास त्यांची थकबाकी पूर्ण देण्यात येईल, सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन निश्चिती करून जुलै 13 पासून वेतनामध्ये लागू करून अदा करण्यात येईल, कर्मचार्‍यांचे थकित वेतन 20 ऑक्टोबरच्या आत अदा करण्यात येईल, असे आयुक्तांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे सफाई कर्मचारी वगळता इतर कर्मचार्‍यांनी संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मनपा कास्ट्राइब कर्मचारी संघटना, म्युनिसिपल मजदूर युनियन, जलसेवा कर्मचारी महासंघ आदींनी संघर्ष कृती समितीच्या अध्यक्षांना तसे पत्र दिले आहे.

सफाई कर्मचार्‍यांच्या संपावर आज निर्णय
पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर दिलेल्या आश्वासनानंतर सफाई कर्मचार्‍यांव्यतिरिक्त इतर कर्मचार्‍यांनी आंदोलनातून माघार घेतली. उद्या सफाई कर्मचार्‍यांच्या आंदोलनातही मध्यस्थी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.