अकोला- प्रशासनाने 18 सप्टेंबरपासून सुरू केलेल्या शहरातील अवैध नळजोडणी शोधमोहिमेत 25 सप्टेंबरला गोरक्षण मार्ग तसेच माधवनगर भागातील 76अवैध नळजोडण्या पथकाने तोडल्या. विशेष म्हणजे प्रतिष्ठित म्हणून गणल्या जाणा-याचाही समावेश आहे, तर दुसरीकडे प्रशासनाने ६६ हजारांचा महसूलही वसूल केला. अवैध नळजोडण्या समूळ नष्ट करण्यासाठी 12 दिवसात एक हजार अवैध नळजोडण्या वैध करण्याचे टार्गेट पाच अभियंत्यांना देण्यात आले आहे.
मागील दोन महिन्यात एकूण 920 अवैध नळधारकांनी
आपल्या जोडण्या वैध केल्या. या माध्यमातून महापालिका प्रशासनाला एकूण 44 लाख रुपयांचा महसूलही प्राप्त झाला. काही दिवसांपासून बंद केलेली ही मोहीम 18 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू करण्यात आली. २६ सप्टेंबरला गोरक्षण मार्ग तसेच माधवनगर या भागात मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या आदेशान्वये उपअभियंता नंदलाल मेश्राम, संदीप चिमनकर, शैलेश चोपडे, धीरज ठाकूर, संतोष पाचपोर, रमेश थुकेकर, संजय डोंगरे, संजय पाटील, शेख फिरोज शेख गफूर यांनी राबवली. एकीकडे अवैध नळजोडणी तोडण्याची कारवाई सुरू असताना काही ठिकाणी अवैध नळजोडणीबाबत तीन वर्षांची पाणीपट्टी भरण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या. या मोहिमेतून प्रशासनाला अडीच ते तीन कोटी रुपये महसूल मिळू शकतो. यामुळे तोट्यात चालणारी पाणीपुरवठा योजना किमान ना नफा तोटा या तत्त्वावर चालू शकते.