आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेच्या करवाढीस स्थगितीसाठी याचिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - येथील नगरपालिकेने सर्वच स्वरुपाच्या करात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसणार असल्याने या निर्णया विरोधात मोदानिश अजहर शेख अहेमद यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली असून, त्याला अंतरीम स्थगिती मागितली आहे. २४ जून रोजी मो. दानिश यांनी अॅड. राज शेख यांच्यामार्फत दाखल केलेल्या या याचिकेवरील निकालाकडे आता सर्वांचेच लक्ष लागले असून, जिल्हाधिकारी सध्या रजेवर असल्याने याचिकेवर उशिरा स्थगिती मिळण्याची शक्यता आहे.
सुमारे १४ चौरस किलोमीटर परिक्षेत्रावर विस्तारलेल्या बुलडाणा शहरात जवळपास १७ हजार मालमत्ताधारकांची संख्या ही यावर्षीच्या वाढीसह झाली आहे. तसेच नळधारकांची संख्या शहरासह लगतच्या भागात नऊ हजार ५९० पेक्षा अधिक आहे. नगरपालिकेला मालमत्ताधारक नळधारकांपासून मिळणाऱ्या कराच्या माध्यमातून नऊ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते आहे. या उत्पन्नात वाढ व्हावी, अशी नगरपालिकेची अपेक्षा आहे. त्यामुळे काही प्रमाणात करवाढ करण्या ऐवजी थेट दुपटीने वाढ करून नागरिकांची लूट चालवण्याचा प्रकार असल्याचे याचिकाकर्ते मो. दानिश अजहर शेख अहेमद यांचे म्हणणे आहे. या याचिकेत मुख्याधिकारी नगराध्यक्षांना प्रतिवादी करण्यात आले आहे. दरम्यान, पालिकेने ही करवाढ १० ते १२ वर्षांनंतर करण्यात आल्याचे जिल्हाधिका-यांना कळवले आहे. नगरपालिकेकडून महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १०१ नुसार नगरपालिकेच्या सन २०१४-२०१५ चे सुधारित अंदाजपत्रक २०१५-२०१६ च्या संकल्पीत अंदाजपत्रकावर विचार करून १६ फेब्रुवारी २०१५ रोजी अंदाजपत्रक मंजुरीचा ठराव घेण्यात आला. नगरपालिकेच्या सर्व ३० सदस्यांनी अंदाजपत्रक वाचताच स्वाक्षरी केल्यामुळे प्रशासनाने अंदाजपत्रकानुसार कर आकारणीची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार मालमत्ता पाणीपट्टी करात दुपटीने वाढ करण्यात आल्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
याचिका नागरिकांच्या हिताची
पालिकेने घेतलेल्या ठरावास अंतरीम स्थगिती मिळाल्यास सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. मात्र, या ठरावास स्थगिती दिल्यास प्रतिवादी असलेले मुख्याधिकारी नगराध्यक्ष यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, अशी याचिकाकर्ते मो. दानिश यांचे म्हणणे आहे.

ठरावाला मागितली स्थगिती
नगरपालिकेने १६ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक एक पारीत केला आहे. या करवाढीबाबतच्या अंतीम निकाल लागेपर्यंत या ठरावाला अंतीम स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी याचिकेतून केली आहे. मो.दानिश अजहर शेख अहेमद, याचिकाकर्ता

मालमत्ता करात नव्हे, तर पाणीपट्टीत वाढ
पालिकेने मालमत्ता करात वाढ केली नसून, पाणीपट्टीत वाढ केली आहे, अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना करवाढीबाबतच्या तक्रारीनंतर पाठवलेल्या पत्रात दिली आहे. त्यामुळे या याचिकेवर पुढे काय निर्णय होणार, याबाबत नागरिकांना उत्सुकता लागली आहे.

भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांचा विरोध
भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी नगरपालिकेच्या करवाढीच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. परंतु, या प्रकरणात या पक्षांच्या नेत्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली नाही. त्यामुळे त्यांच्या भुमिकेकडेही आता शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...